कराड नगरपरिषद निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माहितीमलकापूर निवडणुकीत समविचारी उमेदवारांना काँग्रेसची मदत
कराड : विद्या मोरे
कराड व मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होण्यासाठी काही जागांबाबत तडजोडीचे प्रयत्न झाले होते. हे प्रयत्न माजी मंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून झाले असले तरी मी कोणत्याही चर्चेत प्रत्यक्ष सहभागी नव्हतो, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
बैठका व चर्चांनंतर कराड नगरपरिषद निवडणूक काँग्रेसने स्वबळावर, म्हणजेच पक्षाच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीत काही पक्षांकडून ‘आघाडी करूनच लढावे’ अशी मागणी होती. मात्र ते शक्य नसल्यामुळे काँग्रेसने कराड नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांचे उमेदवार अधिकृत चिन्हावर मैदानात उतरवले आहेत. मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत मात्र काँग्रेस समविचारी उमेदवारांना मदत करून निवडणूक लढवणार आहे.
ते पुढे म्हणाले, “काँग्रेसने अंतिम निर्णय घेतला आहे. कराडमध्ये काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवली जाईल आणि नगराध्यक्षपदावर आमचा विजय निश्चित आहे.”
काँग्रेससोबतच शिवसेना (ठाकरे गट) येथूनही एक उमेदवार रिंगणात असून त्यांच्या प्रचारातही काँग्रेस सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. “मी प्रत्यक्ष रोज गल्लीबोळात फिरणार नाही, पण उमेदवारांच्या विनंतीनुसार मी तसेच काँग्रेसचे स्टार प्रचारक सभा व प्रचार करतील,” असे चव्हाण म्हणाले.
‘मनोहर शिंदे गेले तरी शुभेच्छाच’; पृथ्वीराज चव्हाण
अलीकडे भाजपात प्रवेश केलेल्या कराड दक्षिण काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोहर शिंदे याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, “ते भाजपात गेल्याचे मला समजले. त्यांनी चर्चा केली असती तर मी त्यांना आशीर्वाद दिला असता. त्यांनी निर्णय घेतला आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा.”
कराड-मलकापूर निवडणुकीत काँग्रेसचे स्टार प्रचारक सहभागी — एड. अमित जाधव
कराड शहर काँग्रेस अध्यक्ष एड. अमित जाधव यांनी सांगितले की, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार कराड नगरपरिषद निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवत आहे. काँग्रेसच्या चिन्हावरील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे अर्ज वैध ठरले असून सर्वच प्रभागांमध्ये स्थानिक विकासाचा अजेंडा ठेऊन प्रचार केला जाणार आहे.
या प्रचारासाठी खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम, चंद्रकांत हंडोरी आदी स्टार प्रचारक येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
Comments
Post a Comment