दुबार मतदारांबाबत निवडणूक अधिकार्यांची संयुक्त बैठक
🗳️
पारदर्शक व अचूक कामकाज करण्याच्या सूचना – निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे
कराड : विद्या मोरे
आगामी कराड व मलकापूर नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांबाबत तपासणी आणि सुधारणा प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने कंबर कसली आहे. कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली बी.एल.ओ., पर्यवेक्षक, विभाग प्रमुख आणि सेक्टर अधिकारी यांची संयुक्त बैठक स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पार पडली.
✳️ दुबार मतदार तपासणीस गती
बैठकीस मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, “निवडणुकीत मतदार यादी ही अत्यंत मूलभूत घटक असून पारदर्शक निवडणुकीसाठी तिची अचूकता महत्त्वाची आहे.” राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीप्रमाणे कराड नगर परिषदेत १,९९८ तर मलकापूर नगर परिषदेत ५५५ दुबार मतदार आढळले असून, त्यांच्याबाबत आवश्यक फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने सर्व नागरिक व राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले आहे की, बी.एल.ओ. अधिकारी गावनिहाय भेट देऊन दुबार मतदारांची माहिती संकलित करतील. संबंधित मतदारांनी आपले परिशिष्ट-१ तातडीने भरून बी.एल.ओ. यांच्याकडे सुपूर्द करावे. तसेच मयत, दुबार किंवा स्थलांतरित मतदारांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या गेल्या.
✳️ मतदान केंद्रावरील सुविधा तपासाव्यात
कराड शहरात १२ आणि मलकापूर शहरात ५ सेक्टरमार्फत संपूर्ण मतदान प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती श्री. म्हेत्रे यांनी दिली. मतदान केंद्रांवरील लाईट, पिण्याचे पाणी, रॅम्प, फर्निचर यांसारख्या मूलभूत सुविधा योग्य स्थितीत आहेत का याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
मतदार जनजागृती वाढवून जास्तीत जास्त नागरिकांनी निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. “ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया सर्वांनी मिळून यशस्वी करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे म्हेत्रे म्हणाले.
✳️ उपस्थित मान्यवर
या बैठकीस मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, कराड नगरपरिषदेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे आणि प्रशांत व्हटकर, मलकापूर न.प. चे सहाय्यक अधिकारी कपिल जगताप, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, बाबुराव राठोड, व्ही. आर. राजपूत आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सहाय्यक महसूल अधिकारी युवराज पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment