कराडमध्ये २१९७ रेशन कार्डधारक अपात्र; साहिला नायकवडे यांच्यासह संबंधितांची विभागीय चौकशी कराशासनाच्या अधिकृत यादीबाहेरील लाभार्थ्यांना कोणत्या निकषांवर अपात्र केले? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्पीड पोस्टाने तक्रार; नियमबाह्य कार्यवाहीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही ची मागणी २१९७ लाभार्थी अपात्र; प्रकरणाची विभागीय चौकशीची मागणी
कराड, दि. १३ : विद्या मोरे ; कराड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत कराड तालुक्यातील तब्बल २१९७ रेशन कार्डधारक कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीतील लाभार्थी यादीतून अपात्र करण्यात आल्याच्या प्रकरणाची विभागीय स्तरावर स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश तुकाराम पवार यांनी केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्पीड पोस्टाने तक्रार
यासंदर्भात विभागीय आयुक्त, उपआयुक्त (पुरवठा), सातारा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे दि. १३ जुलै २०२६ रोजी स्पीड पोस्टाद्वारे सविस्तर तक्रार अर्ज पाठविण्यात आला आहे. तक्रारीत संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
अपात्रतेच्या निकषांवर उपस्थित प्रश्न
शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत यादीव्यतिरिक्त आणखी २१९७ कुटुंबांना कोणत्या निकषांवर, कोणत्या सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशानुसार आणि कोणत्या प्रशासकीय प्रक्रियेनुसार अपात्र करण्यात आले, याचा संपूर्ण तपशील चौकशीत समोर आणावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
नोटीस, पडताळणी आणि नियमपालनाची तपासणी
संबंधित लाभार्थ्यांना अपात्र करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती का, प्रत्यक्ष घरभेट व पडताळणी झाली होती का, लाभार्थ्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती का, तसेच शासनाच्या नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
ई-पीडीएस नोंदींच्या बदलांची चौकशी
ई-पीडीएस प्रणालीतील लाभार्थ्यांच्या नोंदी कोणी, कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या कारणास्तव बदलल्या, तसेच या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा नियमभंग किंवा अधिकारांचा गैरवापर झाला आहे का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
साहिला नायकवडे यांच्यासह दोषींवर कारवाईची मागणी
चौकशीत पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती साहिला नायकवडे अथवा इतर कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गणेश तुकाराम पवार यांनी केली आहे.
पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा
पात्र लाभार्थ्यांवर अन्याय झाला असल्यास त्यांना तातडीने न्याय मिळावा, त्यांचा रेशनचा लाभ पूर्ववत करण्यात यावा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षाही तक्रारदारांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment