कराड कृषी महोत्सवाची तारीख अनिश्चित; शासकीय यंत्रणा निवडणुकीत व्यस्त
( जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासोबत आढावा बैठकीत चर्चा करताना सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे,सचिव आबासो पाटील,व शासकीय अधिकारी.)
कराड : विद्या मोरे
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीतर्फे दरवर्षी २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणारे कृषी-औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन यंदा पुढे ढकलण्यात आले आहे. नगरपालिका निवडणुका सुरू असताना शासकीय यंत्रणा पूर्णतः निवडणूक कामात गुंतणार असल्याने प्रदर्शनाचे नियोजन वेळेत आणि सक्षमरीत्या पार पाडणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
शुक्रवारी सातारा येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका निवडणुकांसह काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचीही शक्यता असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शासकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने प्रदर्शनाच्या कामात अडचणी निर्माण होतील, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राज्यभरातील लाखो शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणे, शासकीय योजना आणि पशुसंवर्धन विषयक माहिती मिळवण्यासाठी कराडमध्ये आयोजित होणाऱ्या या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. कृषी, पशुसंवर्धन, महसूल, सहकार अशा विविध विभागांचा सक्रिय सहभाग असल्याने शासकीय यंत्रणेची उपलब्धता अत्यावश्यक आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच प्रदर्शनाची नवीन तारीख निश्चित करण्याचे ठरविण्यात आले आहे. पुढील बैठकीनंतर नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.
शेतकरी आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी, तसेच पुढील अधिकृत घोषणेची प्रतीक्षा ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment