कराड नगरपरिषद निवडणूक : ईव्हीएम मशीन सिलिंग प्रक्रिया पारदर्शक वातावरणात पूर्ण
कराड : विद्या मोरे
कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन सिलिंगची महत्त्वपूर्ण प्रक्रिया शनिवारी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पारदर्शक व सुरळीत वातावरणात पूर्ण करण्यात आली.
सकाळी ८ वाजता सर्व उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींसह शासकीय अधिकारी व कर्मचारी नियोजित स्थळी वेळेत उपस्थित झाले होते. प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी ईव्हीएम मशीन, मतपत्रिका, मशीन जोडणी व त्यातील सूक्ष्म बाबींबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष मशीन सिलिंगची प्रक्रिया सुरू झाली.
यासाठी १५ टेबलांवर १५ सेक्टर अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. सिलिंगदरम्यान कामकाजात सातत्य, काटेकोरपणा आणि पूर्ण अचूकता राखली जावी यासाठी निर्णय अधिकारी म्हेत्रे यांनी वेळोवेळी सूचना देत संपूर्ण प्रक्रिया नियंत्रित ठेवली.
यानंतर उमेदवारांच्या उपस्थितीत एकूण ७४ मशीन आणि राखीव मशीन यांच्या एकसारख्या चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या. लॉटरी पद्धतीने ९ मशीन नमुना मतदानासाठी निवडण्यात आल्या. निवडलेल्या मशीनवर प्रत्यक्ष नमुना मतदान घेण्यात आले असून, उपस्थित सर्व उमेदवार व प्रतिनिधींना नमुना मत देण्याची संधी देण्यात आली.
या संपूर्ण कार्यवाही दरम्यान निवडणूक निरीक्षक ज्योती कावरे उपस्थित राहून प्रक्रिया तपासली. त्यांनी सिलिंग आणि नमुना मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कामकाज निर्विघ्न पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत व्हटकर, सहाय्यक महसूल अधिकारी युवराज पाटील यांनीही प्रभावी समन्वय साधून महत्त्वाची भूमिका बजावली.
Comments
Post a Comment