वारुंजी ZP गटात विकासाची नवी दिशा — नामदेवराव पाटील यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद
कराड : विद्या मोरे. वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव (आप्पा) पाटील यांनी सर्वसमावेशक आणि योजनाबद्ध प्रचारमोहिमेला वेग दिला आहे. दिवाळीच्या शुभप्रसंगी त्यांनी गटातील साडेआठ हजारांहून अधिक कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप करून जनसंपर्काचा भक्कम पाया रचला. यामुळे त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
*सामाजिक संवेदना आणि विकासाभिमुख नेतृत्व*
सामाजिक भान, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि प्रामाणिक कार्यपद्धती यामुळे नामदेवराव आप्पा पाटील यांची ओळख एक प्रभावी नेतृत्व म्हणून झाली आहे. वारुंजी पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी गेल्या काळात गटातील प्रत्येक गावात थेट संपर्क ठेवत विविध ग्रामविकासाच्या कामांना गती दिली.
गटातील रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, अंगणवाडी इमारती, ग्रामसभांच्या समस्या— अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
*पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गतीमान विकास*
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात कराड दक्षिण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. त्याच विकासदृष्टीतून वारुंजी गटातही नामदेवराव पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणून अनेक प्रलंबित प्रकल्पांना चालना दिली.
त्यांच्या माध्यमातून हाती घेतलेल्या कामांमुळे गटातील पायाभूत सुविधा मजबूत झाल्या असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानातही सकारात्मक बदल होत आहे.
*विकास हेच ध्येय : नामदेवराव पाटील*
“कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास हा आमचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. या विकासाची जाणीव कराडकरांना प्रत्यक्ष अनुभवातून झाली आहे,” असे नामदेवराव पाटील यांनी सांगितले.
वारुंजी जिल्हा परिषद गट महिला राखीव असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य या गटातून उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“विकासकार्यात कुठेही तडजोड नाही— जनतेच्या सेवेसाठी समर्पित राहणे हेच आमचे ध्येय आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
*जनतेमध्ये उत्साहाची लाट*
दिवाळी किट वाटप, सभासमारंभ, घरभेट मोहिमा, ग्रामभेट कार्यक्रम यांना वाढता प्रतिसाद पाहता नामदेवराव पाटील यांच्या प्रचाराला गती मिळाली आहे. गटातील विविध समाजघटक, युवा, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटी घेऊन ते स्थानिक प्रश्नांचा आढावा घेत आहेत.
Comments
Post a Comment