सहकाराच्या आड लपलेला 112 कोटींचा खेळ उघड : यशवंत बँकेच्या तीन शाखांवर ईडीची धडक, भाजप अडचणीत

 

कराड : विद्या मोरे
पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या यशवंत सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं (ED) थेट हस्तक्षेप करत फलटण, कराड आणि सातारा येथील बँकेच्या तीन शाखांवर मंगळवारी पहाटे छापे टाकले. तब्बल 112 कोटी रुपयांच्या आर्थिक अपहाराच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामुळे सहकाराच्या नावाखाली सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांचं गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.

या कारवाईदरम्यान भाजप नेते, राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि यशवंत सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे धाकटे बंधू शार्दूल उर्फ मुकुंद चरेगावकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. ईडीच्या पथकानं पहाटे कराड येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यानंतर त्यांना थेट यशवंत बँकेच्या कराड शाखेत आणून चौकशी सुरू केली.

तीन ठिकाणी एकाचवेळी झाडाझडती

ईडीच्या तीन स्वतंत्र पथकांनी एकाचवेळी फलटण येथील मुख्य शाखा, कराड शाखा आणि सातारा शाखेवर झाडाझडती सुरू केली. बँकेतील आर्थिक व्यवहार, कर्ज वाटप, ठेवींचा वापर, संचालक मंडळाचे निर्णय आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. मंगळवारी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

112 कोटींचा अपहार; 50 जणांवर गुन्हा

यशवंत सहकारी बँकेत 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं आधीच उघड झालं आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह एकूण 50 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.
विशेष म्हणजे, 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2025 या कालावधीत बँकेच्या कारभारात सहभागी असलेल्या संचालक मंडळावर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह

या प्रकरणात अटक टाळण्यासाठी मुकुंद चरेगावकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र तो न्यायालयानं फेटाळून लावूनही आजपर्यंत पोलिसांनी एकाही आरोपीला अटक न करणं हे संशयास्पद ठरत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, आता ईडीच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाला गती मिळणार असल्याची चर्चा आहे.

मेधा कुलकर्णींची आरबीआयकडे तक्रार

भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यशवंत सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) थेट तक्रार केली होती. सहकारी बँकिंग व्यवस्थेतील अनियमिततेवर कठोर कारवाईची त्यांनी मागणी केली असून, त्यांच्या तक्रारीनंतरच हे प्रकरण केंद्रस्तरावर गंभीरपणे घेतलं गेल्याचं बोललं जात आहे.

सहकार व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात

यशवंत बँक प्रकरणामुळे सहकाराच्या नावाखाली चालणाऱ्या आर्थिक कारभाराची विश्वासार्हता पुन्हा एकदा प्रश्नांकित झाली आहे. शेतकरी, सर्वसामान्य ठेवीदार आणि स्थानिक उद्योजकांच्या पैशांचा गैरवापर झाल्यास जबाबदारी कोणाची, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

ईडीच्या तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार