AI तंत्रज्ञानाच्या साथीने कराडमध्ये भरणार 20 वे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शन; शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीचा महाउत्सव
कराड : विद्या मोरे. शेती उत्पन्न बाजार समिती, कराड यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शन यंदा 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात भरविण्यात येणार आहे. यंदाचे हे प्रदर्शन 20 व्या वर्षात पदार्पण करत असून, आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण, पशुसंवर्धन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेती पद्धतींचे प्रत्यक्ष सादरीकरण शेतकऱ्यांना अनुभवता येणार आहे.
या भव्य प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ बुधवार, दि. 17 डिसेंबर रोजी रयत सहकारी साखर कारखान्याचेव चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव उर्फ सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, संचालक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालक सर्जेराव गुरव व कोयना बँकेचे संचालक संपतराव बडेकर यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.
हे कृषि प्रदर्शन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेले देशातील एकमेव प्रदर्शन असल्याचे गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आले. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले आधुनिक ज्ञान, सुधारित शेती पद्धती, स्मार्ट फार्मिंग, कृषी यंत्रसामग्री, पशुपालन, दुग्धव्यवसाय, फळबाग लागवड तसेच AI तंत्रज्ञानाचा शेतीतील प्रभावी वापर याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन या प्रदर्शनात मिळणार आहे.
या उपक्रमासाठी राज्य शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, आत्मा विभाग तसेच कराड व मलकापूर नगरपरिषद यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स असून शेतकऱ्यांना शासकीय योजना, अनुदान व प्रशिक्षणाबाबत माहिती दिली जाणार आहे.
मंडप उभारणीच्या शुभारंभी बोलताना ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले,
“शेतकरी हा या प्रदर्शनाचा केंद्रबिंदू आहे. आधुनिक तंत्रज्ञान शेतीत उतरले तर उत्पादनवाढ निश्चित होईल. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून शेती अधिक सक्षम व नफेखोर बनेल.”
मंडप व्यवस्थेबाबत माहिती देताना धीरज तिवारी यांनी सांगितले की, प्रदर्शनासाठी पिलरलेस, वॉटरप्रूफ व उंच भव्य डोम उभारण्यात येत असून, त्यामध्ये सुमारे 400 स्टॉल्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वतंत्र पशु-पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टॉल्स यामध्ये असतील. शेतकरी हित लक्षात घेऊन यंदा 100 स्टॉल्स शेतकरी बांधवांसाठी मोफत देण्यात येणार आहेत.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रा. धनाजी काटकर, रयत कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, हणमंतराव चव्हाण, संपतराव इंगवले, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, उत्तमराव जगताप, श्रीमंत काटकर, यशवंत बँकेचे चेअरमन महेशकुमार जाधव, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, माजी सभापती-उपसभापती, शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शेतीच्या महाउत्सवाला शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
▪ कराड येथे 26 ते 30 डिसेंबर दरम्यान 20 वे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शन
▪ शेती उत्पन्न बाजार समिती, कराड यांचे आयोजन
▪ प्रदर्शनाचे 20 व्या वर्षात पदार्पण
▪ AI आधारित शेती, स्मार्ट फार्मिंग व आधुनिक तंत्रज्ञान यांचे सादरीकरण
▪ कृषी यांत्रिकीकरण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसायावर भर
▪ पिलरलेस, वॉटरप्रूफ व उंच भव्य मंडप
▪ सुमारे 400 स्टॉल्स, त्यापैकी 100 स्टॉल्स शेतकऱ्यांसाठी मोफत
▪ स्वतंत्र पशु-पक्षी दालन व आरोग्य विभागाचे विशेष स्टॉल
▪ कृषी विभाग, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग यांचे सहकार्य
▪ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेले देशातील एकमेव कृषि प्रदर्शन
Comments
Post a Comment