इंडिगो क्रायसिसवर पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; मक्तेदारी मोडून काढण्याची मागणी
कराड: विद्या मोरे
मुंबई इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड गैरसोयीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, DGCA व विमान कंपन्यांवर जोरदार टीका केली. विमान वाहतूक क्षेत्रातील वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार–एअरलाइन संगनमतामुळेच आजची स्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
“इंडिगो क्रायसिस हा DGCA व केंद्र सरकारच्या ढिलाईचा परिणाम”
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,
> “इंडिगोचा प्रवासी क्रायसिस हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. DGCA आणि केंद्र सरकारने इंडिगोला दिलेल्या सूट व नियमभंगावर घेतलेल्या बंदोबस्ताच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.”
DGCA ने 1 जुलै 2024 पासून लागू करायचे नियम अमलात न आणल्यामुळे इंडिगोची मक्तेदारी वाढतच गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विमान वाहतूक क्षेत्रात दोन कंपन्यांचीच मक्तेदारी
चव्हाण पुढे म्हणाले–
इंडिगोचा 65% आणि
टाटा समूहाचा 30%
असा एकूण 95% बाजारपेठेवर नियंत्रण आहे.
> “ही अत्यंत धोकादायक स्थिती असून भविष्यकाळात याचे गंभीर परिणाम होतील,” असे चव्हाण म्हणाले.
स्पर्धा आयोगावरही गंभीर आरोप
स्पर्धा आयोगाला अशा मक्तेदारीवर नियंत्रण ठेवण्यात पूर्ण अपयश आल्याचा आरोप करत,
> “हा आयोग बरखास्त करून नवा सक्षम आयोग स्थापन करावा,”
अशी मागणी त्यांनी केली.
इंडिगोचे दोन भाग करून दोन्ही कंपन्यांचा जास्तीत जास्त 30-30% मार्केट शेअर ठेवावा, असा प्रस्तावही त्यांनी मांडला.
इलेक्ट्रोर बॉण्ड व DGCA निर्णयांवर प्रश्नचिन्ह
चव्हाण यांनी म्हटले की,
> “इंडिगोच्या मालकांनी BJP ला इलेक्ट्रोर बॉण्डद्वारे 56 कोटी रुपयांची देणगी दिली. DGCA च्या निर्णयांशी याचा काही संबंध आहे का? हे तपासणे आवश्यक आहे.”
अदानी डिफेन्सच्या पायलट ट्रेनिंग संस्थेच्या खरेदीवर चिंता
25 नोव्हेंबर 2025 रोजी अदानी डिफेन्सने देशातील सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग संस्था विकत घेतली.
> “काही दिवसांपूर्वीच केंद्राने 30,000 पायलटांची गरज व्यक्त केली आणि त्यानंतर लगेचच ही खरेदी झाली. त्यामुळे पायलट प्रशिक्षण क्षेत्रातही मक्तेदारीची भीती निर्माण झाली आहे,” असे चव्हाण म्हणाले.
प्रवाशांच्या आर्थिक नुकसानीसाठी 1000 कोटींचा विशेष फंड
प्रवाशांनी दुप्पट–तिप्पट किंमतीत तिकीट घेतल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत चव्हाण म्हणाले–
> “भोपाळ गॅस दुर्घटनेप्रमाणेच नुकसानभरपाई द्यावी. सरकारने किमान 1000 कोटींचा विशेष फंड तयार करावा.”
पत्रकार परिषदेत मांडलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख मागण्या
1. केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
2. DGCA मधील जबाबदार अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे.
3. इंडिगोचे CEO यांना तात्काळ निलंबित करावे.
4. क्रायसिसवर 15 दिवसांत अहवाल देणारी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.
5. विद्यमान स्पर्धा आयोग बरखास्त करून सक्षम नवीन आयोग स्थापन करावा.
6. इंडिगोचे दोन तुकडे करून मक्तेदारी रोखावी.
7. मनमोहन सिंग सरकारने प्रस्तावित केलेल्या CAA (Civil Aviation Authority) ची रचना लागू करावी.
*महत्वाचे विधान*
“विमान वाहतूक क्षेत्रातील मक्तेदारी देशासाठी धोकादायक आहे.”
“2004 मध्ये 10 विमान कंपन्या होत्या; आज फक्त 2 मोठ्या कंपन्या उरल्या आहेत.”
“40 कोटी प्रवासी आणि फक्त दोन कंपन्या—ही स्थिती पुढे अधिक गंभीर होऊ शकते.”
“सरकारने विमान वाहतूक क्षेत्र पूर्ण खाजगी हातात न जाता स्वतःची विमान कंपनी सुरू करावी.”
Comments
Post a Comment