रेकॉर्ड विभागात हजारहून अधिक उतारे प्रलंबित; खाबूगीरीमुळे नागरिक त्रस्त – रक्षक प्रतिष्ठाणची कठोर कारवाईची मागणी
कराड – विद्या मोरे
कराड तहसिल कार्यालयातील रेकॉर्ड विभागात खाबूगीरीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढल्याचा गंभीर आरोप रक्षक प्रतिष्ठाणतर्फे करण्यात आला आहे. विभागातील काही अधिकारी व कर्मचारी नागरिकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे समोर आले असून पैसे दिल्यासच उतारे मिळतात, तर सामान्य नागरिकांची हजारहून अधिक उतारे दोन महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
याबाबतचे निवेदन तहसिलदार कल्पना ढवळे यांना रक्षक प्रतिष्ठाणतर्फे देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज माळी, उपजिल्हाध्यक्ष सतीश पानगुडे, विकास तुपे, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मिलन गोरे, भैया माळी, राजकुमार पाटील, बंटी मोरे, ऋषी तुपे, सूरज गावडे, संस्कार भोसले, रंजीत पाटील, अथर्व माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांना अपमानास्पद वागणूक – मनोज माळी
यावेळी बोलताना मनोज माळी म्हणाले की,
“सर्वसामान्य नागरिकांसाठी रेकॉर्ड विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज शेकडो नागरिक उताऱ्यांसाठी येथे येतात; परंतु त्यांना कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागतो. एका उताऱ्यासाठी हजार रुपये मागितले जातात, पैसे दिले नाहीत तर उतारे दिले जात नाहीत. याचा नागरिक प्रचंड त्रास सहन करत आहेत.”
त्यांनी सांगितले की, जवळपास हजारहून अधिक उतारे दीर्घकाळ प्रलंबित आहेत. या सर्व बाबत विचारणा केली तरी नागरिकांशी कर्मचाऱ्यांकडून आरडाओरड, उद्धट वर्तन आणि दडपशाहीचा वापर केला जातो. काही अधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांना उघडपणे पाठराखण दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला.
संपूर्ण चौकशी व कठोर कारवाईची मागणी
रक्षक प्रतिष्ठाणतर्फे तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की—
रेकॉर्ड विभागातील संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी करावी
नागरिकांचा अपमान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ बाजूला करावे
प्रलंबित असलेले सर्व उतारे तातडीने जारी करावेत
दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई करावी
अन्यथा रक्षक प्रतिष्ठाणतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा मनोज माळी यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment