साताऱ्यात कायद्याला हरताळ! अवैध गुटखा विक्रीविरोधात रक्षक प्रतिष्ठान आक्रमक; पोलीस अधीक्षकांना निवेदन

 
कराड : विद्या मोरे
महाराष्ट्र राज्यात गुटखा, सुगंधित तंबाखू व माव्याच्या विक्रीवर कायदेशीर बंदी असतानाही सातारा जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीमुळे कायद्याची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप करीत रक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना निवेदन देण्यात आले.

रक्षक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या मेळाव्यात संस्थापक सुशीलदादा मोझर यांनी अवैध गुटखा विक्रीविरोधात स्पष्ट व ठाम भूमिका मांडली. लहान टपऱ्यांपासून ते मोठ्या दुकानांपर्यंत गुटखा सहज उपलब्ध असून, शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात तरुण व किशोरवयीन मुलांमध्ये हे व्यसन झपाट्याने वाढत असल्याने समाजाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कायद्याने स्पष्ट बंदी असतानाही सर्रास सुरू असलेली गुटखा विक्री ही कायद्याच्या अंमलबजावणीतील गंभीर त्रुटी असल्याचे सांगत प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई करावी, अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानने केली आहे. गुटखा व तत्सम अमली पदार्थ हे केवळ व्यक्तीच्या आरोग्यासच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या भवितव्याला धोका ठरत असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले.

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात अमली पदार्थांचे उत्पादन सुरू असल्याची बाब अत्यंत लाजिरवाणी असल्याचे नमूद करत, या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखूची विक्री येत्या सात दिवसांत पूर्णतः बंद करण्यात यावी, अन्यथा रक्षक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व अवैध विक्रेत्यांना थेट पोलिसांच्या स्वाधीन करतील, असा कडक इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ माळी, अमोल तांगडे, दस्तगीर बागवान, सांगली जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ पवार, सातारा जिल्हा संघटक सुशील भाऊ जाधव, सातारा तालुका अध्यक्ष सुमित साळुंखे, तसेच मोहसीन शेख, अक्षय चव्हाण, मंगेश चव्हाण, तन्वीर शेख, गुरुदेव कांबळे, श्रीकांत गडांकुश, बंटी मोरे, अली इनामदार, आरिफ अन्सारी, कृष्णा घाडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार