ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांना ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार २०२५’ प्रदान
कराड : विद्या मोरे
कराडचे जागतिक पातळीवर नाव उज्ज्वल करणारे ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांना विजय दिवस समारोह समितीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार २०२५’ ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखाली हा गौरवशाली समारंभ उत्साहात पार पडला.
सत्काराला उत्तर देताना दादासाहेब सुतार म्हणाले…
त्रिशक्ती फाउंडेशन, पुणे आणि विजय दिवस समारोह समितीने अत्यंत मानाचा व सन्मानाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार देऊन माझा गौरव केला, याबद्दल संस्थापक अध्यक्ष कर्नल संभाजी पाटील, सचिव ॲड. संभाजीराव मोहिते तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
बालपणातील आठवणी सांगताना त्यांनी आपल्या खडतर संघर्षमय शिक्षणाचा प्रवास, आई-वडील व कुटुंबीयांचा आधार, तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई आणि कराडचे भाग्यविधाते पी. डी. पाटील यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेचा विशेष उल्लेख केला.
चित्रकलेचा सातासमुद्रापार पोहोचलेला वारसा
या प्रेरणेमुळेच शिवराज्यारोहन यासारखे ६ × १२ फूट आकाराचे भव्य तैलचित्र अमेरिकेत पोहोचल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘अभिमान’ चित्रपटासह अनेक चित्रपटांच्या पोस्टर्सचे काम स्टुडिओ दिवाकर येथे करताना करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
आजपर्यंत त्यांनी यशवंतराव चव्हाण, किर्लोस्कर, डॉ. द. शि. एरम, माजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे स्वागत दर्शविणारे तैलचित्र (खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान), छत्रपती शिवाजी महाराज, राज्याभिषेक सोहळा अशा ऐतिहासिक प्रसंगांची शेकडो तैलचित्रे साकारली आहेत.
तसेच अनेक विद्यार्थ्यांना चित्रकलेचे उत्कृष्ट प्रशिक्षण देत आज ते देश-परदेशात यशस्वी चित्रकार म्हणून कार्यरत असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
मान्यवरांचे गौरवोद्गार
ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी दादासाहेबांच्या चित्रकलेचे विशेष कौतुक करत त्यांच्या कलाकृती गौरवास्पद असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुभाष एरम यांनी, ३० वर्षांपूर्वी काढलेले डॉ. द. शि. एरम यांचे चित्र आजही तितकेच जिवंत वाटते, रंगात अजिबात फरक पडलेला नाही, असे गौरवोद्गार काढले.
प्रास्ताविकात ॲड. संभाजीराव मोहिते यांनी, चित्रकलेच्या माध्यमातून कराडचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवणारे दादासाहेब सुतार हे कराडचे भूषण आहेत, असे सांगितले.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
मानपत्राचे वाचन : प्रा. डॉ. स्नेहल राजहंस
सूत्रसंचालन : महेंद्र भोसले
आभार प्रदर्शन : ऐश्वर्या पाटणकर
समारोप : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट, बेळगाव बँड पथकाच्या ‘वंदे मातरम्’ गीताने
या कार्यक्रमास आजी-माजी सैनिक, मान्यवर, कलाकार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment