सजग ग्राहक – सशक्त समाज – सक्षम भारत’ : कराड तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जनजागृती

 कराड: विद्या मोरे 
 दरवर्षीप्रमाणे यंदाही २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कराड तहसीलदार कार्यालयाच्या वतीने ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पथनाट्याद्वारे ‘सजग ग्राहक – सशक्त समाज – सक्षम भारत’ असा प्रभावी संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमास कराडच्या तहसीलदार सौ. कल्पना ढवळे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षा व सातारा जिल्हाध्यक्षा सौ. सुनीता राजेघाटगे, तसेच पुरवठा अधिकारी नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

तहसीलदार सौ. ढवळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,
“ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून त्याच्या हक्कांचे संरक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे.”
तसेच १९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्यात २०१८ मध्ये झालेल्या सुधारणा व नव्या तरतुदींमुळे ग्राहकांना अधिक व्यापक व प्रभावी संरक्षण मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुरवठा अधिकाऱ्यांनी नागरिकांना खरेदीवेळी पक्के बिल घेणे, हमीपत्र जतन करणे, तसेच फसवणूक झाल्यास तत्काळ तक्रार नोंदवणे याचे महत्त्व पटवून दिले. ऑनलाईन खरेदी करतानाही विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले.

या वेळी उपस्थितांना ग्राहकांचे प्रमुख हक्क — सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क आणि नुकसानभरपाईचा हक्क — याबाबत एड. भीमराव शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नवीन कायद्यानुसार ऑनलाईन तक्रार नोंदणीची सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी कोषाध्यक्षा सौ. सुनीता राजेघाटगे, जिल्हा कोषाध्यक्ष नंदकुमार काटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आर. के. जाधव, जिल्हा सहसचिव मधुकर मोरे, तालुका अध्यक्ष कॉ. अधिकराव पाटील, कराड शहर अध्यक्ष नितीन शहा, ग्रामीण अध्यक्ष एड. भीमराव शिंदे, शहर सचिव हिरालाल खंडेलवाल, सहकोषाध्यक्ष दत्ताजी खुडे-देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला.

या उपक्रमातून ग्राहक हक्कांविषयी जागरूकता वाढीस लागून सजग, जबाबदार ग्राहक घडण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार