शेती–तंत्रज्ञान–उद्योजकतेचा अनोखा संगमलाखोंच्या उपस्थितीत ३० कोटी रुपयांचा व्यापार कराडमधील यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाला विक्रमी प्रतिसाद**
कराड : (विद्या मोरे)
कराड येथे सलग पाच दिवस आयोजित करण्यात आलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा समारोप मंगळवारी सायंकाळी उत्साहात झाला. शेती, पशुपालन, तंत्रज्ञान आणि ग्रामीण उद्योजकतेचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या या प्रदर्शनात २५ ते ३० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली. तर १२ लाखांहून अधिक शेतकरी व नागरिकांनी भेट देत यंदाच्या प्रदर्शनाला विक्रमी प्रतिसाद दिला.
हे प्रदर्शन कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने, राज्य शासनाचा कृषी विभाग, सातारा जिल्हा परिषद कृषी विभाग व आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. गेली वीस वर्षे सातत्याने भरत असलेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
शेती अवजारे ते घरगुती वस्तू — शेकडो स्टॉल्स
कृषी यांत्रिकीकरण, ट्रॅक्टर, सोलर सिस्टीम, कृषी अवजारे, शेतीपूरक व्यवसाय, हेल्थ–वेल्थ प्रॉडक्ट्स, शिक्षण, ब्युटी व घरगुती साहित्य आदी शेकडो स्टॉल्स या प्रदर्शनात उभारण्यात आले होते.
१० रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच्या वस्तूंची थेट खरेदी–विक्री झाली. ट्रॅक्टर, सोलर सिस्टीम आणि महागड्या कृषी उपकरणांसाठी अॅडव्हान्स बुकिंगवरही मोठे व्यवहार झाले.
आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाचा मेळ
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्चात बचत आणि नफा वाढवण्यासाठी लाईव्ह प्रात्यक्षिके, मॉडेल्स व तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली.
तसेच फळे, फुले, भाजीपाला, ऊस आदी उत्पादनांच्या स्पर्धांबरोबर पशुपक्षी, शेळी–मेंढी व श्वान स्पर्धांनाही शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रयोगशील आणि यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान करून गौरविण्यात आला.
सामाजिक बांधिलकीचा ठसा
या प्रदर्शनाचा सामाजिक पैलूही ठळक ठरला. महिला बचत गटांना मोफत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले. तसेच एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिरे राबविण्यात आली.
प्रदर्शनात उरलेली फळे व भाजीपाला जिजाऊ अनाथ आश्रम, कोळे येथील मुलांना देण्याचा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.
नेतृत्व आणि समन्वयामुळे यशस्वी आयोजन
रयत साखर कारखान्याचे चेअरमन व रयत समूहाचे मार्गदर्शक अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनातून, तसेच शासन व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सहकार्याने हे प्रदर्शन यशस्वी झाले.
डायनॅमिक इव्हेंटचे काटेकोर नियोजन कौतुकास्पद
लाखोंच्या गर्दीतही सुरक्षितता, शिस्त आणि स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी डायनॅमिक इव्हेंट या संस्थेने केलेले नियोजन उल्लेखनीय ठरले.
माईक सिस्टीम, स्टेज व्यवस्थापन, पियरलेस डोम, स्टॉल्सची आकर्षक मांडणी, अत्याधुनिक तांत्रिक सुविधा यामुळे प्रदर्शनाचा अनुभव अधिक सुटसुटीत झाला. त्यामुळे डायनॅमिक इव्हेंटच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आधुनिक, किफायतशीर शेतीकडे वाटचाल
या प्रदर्शनाने शेतकऱ्यांना आधुनिक, किफायतशीर आणि नफा देणाऱ्या शेतीची दिशा दाखवली आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाला साजेशा पद्धतीने हे प्रदर्शन ‘कृषी पंढरी’ म्हणून कराडची ओळख अधिक भक्कम करणारे ठरले आहे.
Comments
Post a Comment