ज्ञात-अज्ञात माहितीचे संकलन व अवलोकन म्हणजेच स्पर्धा परीक्षेची तयारी – संदीप गिरीगोसावी
कराड : विद्या मोरे
● कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च येथे रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या स्थापनेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला.
● बीबीए, बीसीए व एमबीए अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना केंद्रीय व राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षांद्वारे उपलब्ध शासकीय नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळावे व योग्य तयारी करता यावी, या उद्देशाने अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.
● कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दैनिक लोकसत्ताचे व्यवस्थापक श्री. संदीप गिरीगोसावी होते. त्यांनी “ज्ञात व अज्ञात माहितीचे सातत्यपूर्ण संकलन, विश्लेषण व अवलोकन करणे म्हणजेच स्पर्धा परीक्षेची तयारी” असल्याचे सांगितले.
● प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज वर्तमानपत्र वाचणे, अग्रलेखांचे सखोल अध्ययन करणे व त्यावर स्वतंत्र नोंदी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यासाठी स्वतंत्र दैनिक नोंदवही ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
● मार्गदर्शक श्री. अभिषेक गोरे यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना योग्य अभ्यासपद्धती, वेळेचे नियोजन, सातत्य व आत्मविश्वासाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
● शिवाजी कॉलेज स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक डॉ. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण वाचन, चिंतन व सराव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
● अध्यक्षीय भाषणात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी. एस. सावंत यांनी स्पर्धा परीक्षांचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
● मॅनेजमेंट व संगणक शाखेतील विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण घेत असतानाच दुसऱ्या वर्षापासून स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरावेत व विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
● अकॅडमीमध्ये स्वतंत्र अभ्यासिका, ग्रंथालय तसेच तज्ज्ञ मार्गदर्शन वर्ग मोफत उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
● कार्यक्रमाची प्रस्तावना अकॅडमीचे समन्वयक डॉ. संतोष चव्हाण यांनी केली.
● सूत्रसंचालन कु. अमृता पंडित यांनी प्रभावीपणे केले.
● आभार प्रदर्शन एमबीए भाग दोनची विद्यार्थिनी कु. रुपाली कदम हिने केले. तिने सर्व मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले.
● या उद्घाटन समारंभास इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment