‘हात’ चिन्ह म्हणजेच काँग्रेसचा विचार; त्यावरच निवडणूक लढविण्याचा निर्धारसुपने जिल्हा परिषद गटात काँग्रेस कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर – पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ठाम भूमिका

  कराड : विद्या मोरे 
शाहू–फुले–आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या विचारांचे प्रामाणिक पालन करणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असून, हाताचे चिन्ह म्हणजेच काँग्रेसची विचारधारा आहे. हा विचार जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

सुपने–तांबवे जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांची संवाद बैठक सुपने येथे उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. या बैठकीस कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील, इंद्रजीत चव्हाण, बलराज पाटील, जगदीश पाटील, अशोक पाटील, सतीश पानुगडे, सुहास पाटील, प्रदीपराव थोरात, बजरंग पाटील, दादाराम जाधव, विद्याधर पाटील, विजय देवकर, सौ. अक्षदा पवार, सौ. पूजा पवार, हिंदुराव पाटील, निवृत्ती माळी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आगामी निवडणुका काँग्रेसच्या अधिकृत ‘हात’ चिन्हावरच लढवाव्यात, अशी ठाम व एकमुखी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ व निष्काळजी कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप करण्यात आला. तसेच निवडणूक नियोजनातील गंभीर त्रुटींमुळे लोकशाही प्रक्रियेवरच घाला येत असल्याची तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.

देशातील सध्याच्या परिस्थितीवर परखड शब्दांत भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सरकारच्या अपयशामुळे आज तब्बल ८० टक्के जनतेला मोफत धान्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ही स्थिती अभिमानाची नसून, सरकारच्या नाकर्तेपणाचे जिवंत उदाहरण आहे. मोदी सरकारकडून केवळ घोषणांची आतषबाजी होत असून, प्रत्यक्षात सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडताना दिसत नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

भाजपाकडे स्वतःची अशी कोणतीही वैचारिक व संस्थात्मक शिदोरी नसून, आज देशात अस्तित्वात असलेल्या बहुतेक संस्था, यंत्रणा व नेतृत्व हे काँग्रेसनेच घडवलेले आहे. काँग्रेसने उभारलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांची विक्री करण्याचा घाट सध्याचे सरकार घालत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दबाव, भीती व ब्लॅकमेलच्या माध्यमातून काँग्रेसने घडवलेले नेते भाजपात नेले गेले, मात्र भाजपाने आजवर स्वतः एकही मोठा राष्ट्रीय नेता घडवलेला नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला.
काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून तो लोकशाही, संविधान आणि सामाजिक न्यायाचा विचार आहे. हा विचार जपण्यासाठी समाजात वाचनसंस्कृती वाढवणे अत्यावश्यक आहे. व्हॉट्सॲपवर पसरविल्या जाणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता, पुस्तकांच्या आणि विश्वसनीय ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे सत्य जाणून घ्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

बैठकीच्या शेवटी सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने पूर्ण ताकदीने, संघटितपणे आणि विचारधारेवर ठाम राहून निवडणूक लढवावी, अशी ठाम मागणी कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर केली. काँग्रेसची विचारधारा आणि संघटनशक्ती यांच्या बळावरच आगामी निवडणुकीत यश निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार