होमथॉन 1.0’द्वारे बांधकाम क्षेत्राचे आधुनिक दर्शन कराड मध्ये नरेडकोच्या प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पोला सुरुवात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन परवडणाऱ्या घरांच्या संकल्पनांना व्यासपीठ

 ‘
कराड : विद्या मोरे

बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण संकल्पना, टिकाऊ विकास आणि परवडणाऱ्या घरांचा संगम असलेल्या ‘होमथॉन 1.0’ या भव्य प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पोचे उद्घाटन राज्याचे पर्यटन व खणीकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कराड येथे मोठ्या उत्साहात पार पडले. नरेडको (NAREDCO) संस्थेमार्फत आयोजित या प्रदर्शनामुळे सातारा जिल्ह्यासह कराड परिसरातील बांधकाम व्यवसायाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री देसाई यांनी व्यक्त केला.
कराड येथील मलकापूर परिसरात भरविण्यात आलेल्या या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी माजी पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, मलकापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, मनोहर शिंदे, नरेडकोचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खबाले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, अभियंते, वास्तुविशारद तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, वेगाने वाढत असलेल्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता, टिकाऊपणा, पर्यावरणपूरक बांधकाम आणि परवडणारी घरे या बाबींना विशेष महत्त्व देणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास हे उद्दिष्ट सहज साध्य करता येते. ‘होमथॉन 1.0’सारख्या प्रदर्शनांमुळे बांधकाम व्यावसायिकांबरोबरच सामान्य नागरिकांनाही अत्याधुनिक बांधकाम साहित्य, नव्या संकल्पना, गृहप्रकल्प आणि शासकीय योजनांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बांधकाम क्षेत्रासमोरील विविध अडचणींचा उल्लेख केला. नियम, परवानग्या, तांत्रिक बाबी आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे अनेक वेळा बांधकाम व्यावसायिकांना अडथळ्यांना सामोरे जावे लागते. या अडचणी दूर करण्यासाठी एक खिडकी पद्धत (Single Window System) अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असून, व्यावसायिकांनी त्यांच्या समस्या लेखी स्वरूपात शासनाकडे सादर कराव्यात. त्या प्रश्नांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नरेडको संस्थेच्या कार्याबाबत बोलताना उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, हरित बांधकाम आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासासाठी नागरिक, बांधकाम व्यावसायिक आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, कराड व मलकापूर ही शहरे वेगाने विस्तारत असून, अशा प्रदर्शनांमुळे आधुनिक नागरी विकासाच्या संकल्पना प्रत्यक्ष पाहण्याची व समजून घेण्याची संधी नागरिकांना मिळते. झोपडपट्टीमुक्त शहराच्या दिशेने वाटचाल करताना म्हाडासारख्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. यासाठी नागरिकांना माहिती मिळावी म्हणून कराड पालिकेच्या वतीने स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आला आहे.

मलकापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे यांनी सांगितले की, सध्या अनेक तरुण बांधकाम क्षेत्रात उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. त्यांच्या दृष्टीने ‘होमथॉन 1.0’ हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक ठरणार असून, स्थानिक विकासाला चालना देणारे आहे.
प्रास्ताविकात नरेडकोचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खबाले यांनी संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेत बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, तसेच राज्य व केंद्र शासनाने ‘बिल्डर्स डे’ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात नरेडकोच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात अधिक व्यापक, समाजाभिमुख आणि विकासात्मक उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार