गृहलक्ष्मीचा सन्मान म्हणजे कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यास हातभार — ‘होमथॉन 1.0’च्या माध्यमातून नरेडकोचा समाजोपयोगी उपक्रम मलकापूर (कराड) येथे नरेडकोच्या भव्य एक्सपोची उत्साहात सांगता; सौ. उत्तराताई भोसले यांचे प्रतिपादन


कराड  : विद्या मोरे 
घराला खऱ्या अर्थाने ‘घरपण’ देण्याचे कार्य स्त्री करते. तिच्या संवेदनशीलतेतून घरात संस्कार, सुरक्षितता आणि आपुलकी निर्माण होते. त्यामुळे घर हे केवळ चार भिंती नसून प्रत्येक स्त्रीचे स्वतंत्र विश्व असते. ही सामाजिक जाण लक्षात घेऊन नरेडको (NAREDCO) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने आयोजित केलेल्या ‘होमथॉन 1.0’ या भव्य प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्सपोच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. गृहलक्ष्मीचा सन्मान म्हणजेच कुटुंबाच्या भाग्योदयाला दिशा देणे असून, या प्रवासात नरेडकोचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन कृष्णा उद्योग समूहाच्या सौ. उत्तराताई भोसले (आईसाहेब) यांनी केले.
मलकापूर (कराड) येथे 23 ते 27 जानेवारी दरम्यान नरेडकोच्या वतीने आयोजित ‘होमथॉन 1.0’ या भव्य एक्सपोच्या सांगता समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे होते. यावेळी नरेडकोचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खबाले, उपाध्यक्ष सुभाष लोंढे, सौ. शर्मिष्ठा खबाले, व्हिजन डेव्हलपर्सचे प्रशांत चव्हाण, प्रवीण पाटील यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सौ. उत्तराताई भोसले यांनी कराड व मलकापूर परिसरात वेगाने सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांबाबत समाधान व्यक्त केले. नरेडकोसारख्या संस्थेमुळे मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार घर घेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. या एक्सपोमुळे बांधकाम व्यावसायिक, स्टॉलधारक आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद साधला गेला असून, सर्व घटकांना याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सांगितले की, पुणे व मुंबईसारख्या महानगरांच्या धर्तीवर कराडमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘होमथॉन 1.0’ एक्सपो हा निश्चितच अभिमानास्पद उपक्रम आहे. ग्रामीण व निमशहरी भागात असे मोठ्या प्रमाणावरचे प्रदर्शन आयोजित करणे खर्चिक आणि आव्हानात्मक असते; मात्र नरेडकोने ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या यशवंत भूमीने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले, त्या भूमीत सेवा देण्याची संधी मिळणे हे गौरवाचे असल्याचे त्यांनी सांगितले. याच भूमीत सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नरेडकोने केल्याचेही त्यांनी गौरवोद्गार काढले.

घराला घरपण देणाऱ्या स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असली, तरी त्या घराच्या उभारणीसाठी कष्ट करणाऱ्या पुरुषाचाही सन्मान तितकाच आवश्यक असल्याचे मत दत्तात्रय दराडे यांनी व्यक्त केले. नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा, सोसायटीत कुटुंबभावनेने सहकार्य करावे तसेच मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना सक्षम नागरिक बनवावे, असे आवाहन त्यांनी केले. कराड शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, अन्याय अथवा अत्याचार झाल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
प्रास्ताविकात नरेडकोचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खबाले यांनी ‘होमथॉन 1.0’ एक्सपोच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेतला. सामाजिक बांधिलकी जपत बांधकाम क्षेत्रातील छोटे-मोठे व्यावसायिक, स्टॉलधारक आणि ग्राहक यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा एक्सपो आयोजित करण्यात आला होता. पंचक्रोशीतील व्यावसायिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून, भविष्यातही हा एक्सपो सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मनोगतात सौ. शर्मिष्ठा खबाले यांनी प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी सर्वांचे आभार मानले. ‘होमथॉन 1.0’च्या माध्यमातून घर खरेदी प्रक्रियेत महिलांना मिळणारा मान अधोरेखित झाला असून, हा उपक्रम स्त्रीसन्मानाचा उत्सव ठरल्याचे त्यांनी सांगितले.

पैठणी विजेत्या स्वाती साळुंखे यांनी गृहपयोगी व गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. स्टॉलधारक संदीप पवार यांनी अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी ठरलेल्या या एक्सपोबद्दल आनंद व्यक्त करत पुढील वर्षीच्या आयोजनात स्टॉलधारकांना अधिक सक्रिय भूमिका देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

‘होमथॉन 1.0’ एक्सपोमध्ये सहभागी आदर्श स्टॉलधारकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
बिल्डर कॅटेगरीमध्ये वृंदावन सिटी, मलकापूर, एक्सॉन इन्फ्रा एलएलपी व केएसटी कन्स्ट्रक्शन, तर मटेरियल कॅटेगरीमध्ये जी. के. ट्रेडर्स, के. पी. स्टील (राजुरी स्टील) आणि समृद्धी कमॉडिटीज या विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

23 ते 27 जानेवारी दरम्यान एक्सपोला भेट देणाऱ्या महिलांना कुपन देण्यात आले होते. त्यातून निवड झालेल्या महिलांना सौ. उत्तराताई भोसले यांच्या हस्ते पैठणी साडी व नेकलेस देऊन सन्मान करण्यात आला. यात स्वाती अजित साळुंखे, मेघा अमोल थोरात, प्रतीक्षा नितीन जाधव, सुजाता परेश जाधव, ज्योती वाढते, तेजल राहुल पवार, नीलम प्रशांत काजारी, शुभांगी अमरसिंह पाटील तसेच चिठ्ठीद्वारे निवड झालेल्या स्वाती वर्मा यांचा समावेश होता.

प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या भारती विद्यापीठाच्या मॅनेजमेंटचे विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार सागर कुंभार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार