होमथॉन 1.0’ने वेधले लक्ष घरखरेदीदारांसह बांधकाम व्यावसायिकांची मोठी हजेरी रविवारी एक्स्पो परिसरात उसळली गर्दी

 ‘

कराड : विद्या मोरे 
नरेडको (NAREDCO) संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘होमथॉन 1.0’ प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, रविवार (दि. 25) हा दिवस एक्स्पोसाठी विशेष गजबजलेला ठरला. कराड, पाटण, माण-खटाव परिसरातील घरखरेदीदारांसह बांधकाम क्षेत्रातील लहान-मोठ्या व्यावसायिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.

रविवारी बांधकाम साहित्य विक्रेते, आर्किटेक्ट, कंत्राटदार, उद्योजक तसेच सामान्य ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर भेट दिल्याने दिवसभर एक्स्पो परिसरात उत्साहाचे वातावरण होते. शुक्रवार (दि. 23) ते बुधवार (दि. 27) जानेवारीदरम्यान सुरू असलेला हा एक्स्पो केवळ प्रदर्शन न राहता बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांसाठी माहिती, संधी आणि व्यवहाराचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.

या एक्स्पोमध्ये घर, फ्लॅट, प्लॉट, निवासी व व्यावसायिक प्रकल्पांसह अत्याधुनिक बांधकाम साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले आहे. नामांकित कंपन्यांचे पेंट, बिल्डिंग मटेरियल, फर्निचर, किचन सोल्युशन्स, लाइटिंग साहित्य, गृहशोभा व गार्डन डिझाईनचे आकर्षक स्टॉल्स नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत.

प्रत्यक्ष पाहणी करून विविध पर्यायांची तुलना करण्याची संधी मिळत असल्याने अनेक नागरिकांनी सहकुटुंब एक्स्पोला भेट दिली. विशेषतः महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय असून, गृहशोभा, किचन व इंटिरियरशी संबंधित स्टॉल्सवर मोठी गर्दी दिसून आली.

दरम्यान, एक्स्पोला भेट देणाऱ्या महिला माता-भगिनींसाठी खास मेगा ‘लकी ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले असून, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक महिलेला विनामूल्य कूपन देण्यात येत आहे. या लकी ड्रॉमध्ये दहा भाग्यवान महिलांना ओरिजिनल पैठणी साडी, तर प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला पैठणीसह १ ग्रॅम सोन्याची नेकलेस देण्यात येणार आहे. हा मेगा लकी ड्रॉ बुधवार (दि. 27) रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होणार असून, कृष्णा उद्योग समूहाच्या प्रमुख सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.

प्रतिक्रिया

“नरेडकोच्या ‘होमथॉन 1.0’ एक्स्पोला जिल्हाभरातून बांधकाम व्यावसायिक, उद्योजक व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून अनेकांचे हक्काचे घराचे स्वप्न साकार होण्यास निश्चितच मदत होणार आहे,”
— अरविंद खबाले, संस्थापक अध्यक्ष, नरेडको


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार