12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर; मतदान आणि निकाल कधी? जाणून घ्या


कराड: विद्या मोरे 
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून सर्वच प्रमुख राजकीय पक्ष, आघाड्या तसेच अपक्ष उमेदवारांकडून तयारीला वेग आला आहे.

निवडणूक प्रक्रियेला 16 जानेवारी 2026 पासून सुरुवात होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 16 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तालुका पातळीवर अर्ज स्वीकारण्यासाठी प्रशासनाने आवश्यक व्यवस्था पूर्ण केली असून निवडणूक कार्यालयांमध्ये उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारी 2026 रोजी करण्यात येणार आहे. छाननीनंतर पात्र व अपात्र अर्जांची यादी जाहीर केली जाणार आहे. उमेदवारांना 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार असून, त्याच दिवशी दुपारी 3.30 नंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शांततापूर्ण, निर्भय व पारदर्शक वातावरणात मतदान होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मतदानानंतर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निवडणूक निकाल जाहीर केले जाणार आहेत. या निकालांमुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सत्तासमीकरणे कशी बदलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ग्रामीण विकास, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती व स्थानिक प्रश्न हे मुद्दे निवडणूक प्रचारात केंद्रस्थानी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अनेक ठिकाणी नव्या उमेदवारांची जोरदार तयारी सुरू असून स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते बदलताना दिसत आहेत.

निवडणूक प्रशासनाने मतदारांना मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार