पोलीस पायाभूत सुविधा उभारणीसाठी १२५ कोटींची मागणी : आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 कराड : विद्या मोरे 

सातारा : कराड शहर व तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारणीसाठी १२५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सातारा येथे ‘वृंदावन पोलीस टाउनशिप’च्या उदघाटनप्रसंगी त्यांनी हे निवेदन सादर केले.

कराडमधील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेले शहरीकरण आणि त्यामुळे निर्माण होणारी सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेची नवीन आव्हाने लक्षात घेता पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचे आ. डॉ. भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे.

यासाठी कराड शहर आणि तालुक्यात गरजेनुसार नवीन पोलीस चौक्या उभारणे, विद्यमान चौक्यांचे आधुनिकीकरण, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गार्डरूम, अत्याधुनिक शस्त्रागार उभारणे, उपजिल्हा कारागृह (सबजेल) निर्माण करणे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे. या सर्व सुविधांसाठी एकूण १२५ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

सक्षम आणि सुदृढ पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येईल. कराड शहराचा सातत्याने होत असलेला विकास आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ही गरज तातडीची असल्याचे आ. भोसले यांनी नमूद केले.

या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत कराडमधील पोलीस यंत्रणा सशक्त करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली असल्याचेही आ. भोसले यांनी सांगितले.

या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार