कृष्णा पुलावर मृत्यूचे सत्र थांबवण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष; संरक्षक जाळ्यांकडे दुर्लक्ष झाल्याने मनोज माळी यांचे अमरण उपोषण, प्रशासन झोपेत असल्याचा नागरिकांचा आरोप
कराड : विद्या मोरे
कराड शहरानजीक असलेल्या गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा पुलावरून सातत्याने घडणाऱ्या महिलांच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे हा पूल ‘सुसाईड पॉईंट’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक जाळ्या बसवाव्यात, या ठोस मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठाणचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी मंगळवारपासून येथील प्रशासकीय इमारतीसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.
आंदोलन सुरू होताच रक्षक प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांनी उपोषण स्थळी मोठी गर्दी केली. कृष्णा पुलावरील संरक्षक कठड्यांची उंची अपुरी असल्याने महिलांना सहज कठड्यांवर चढता येते आणि त्यामुळे आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे वास्तव वारंवार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पुलाच्या दोन्ही बाजूंना मजबूत संरक्षक जाळ्या बसवणे अत्यावश्यक असल्याचा आग्रह रक्षक प्रतिष्ठाणने अनेक वेळा धरला आहे.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून सुमारे ४३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनीही पत्राद्वारे संरक्षक जाळ्या बसविण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला सूचना दिल्या होत्या. मात्र एवढा पाठपुरावा होऊनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका युवतीने कृष्णा पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार निवेदने, पाठपुरावा व इशारे देऊनही प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने अखेर अमरण उपोषणाचा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे मनोज माळी यांनी स्पष्ट केले आहे.
उपोषण सुरू झाल्यानंतर काही तासांतच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सादर केलेला प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले. मात्र जोपर्यंत लेखी मंजुरीचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज माळी यांनी जाहीर केली आहे.
वकील दाम्पत्याचा ठाम पाठिंबा
कृष्णा पुलावरील महिलांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात ॲड. पद्मजा लाड व ॲड. मिलिंद लाड यांनीही आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. त्यांनी उपोषण स्थळी धरणे आंदोलन सुरू केले असून, दोन दिवसांत मंजुरीचे पत्र मिळाले नाही तर मनोज माळी यांच्यासोबत अमरण उपोषणात सहभागी होणार असल्याचा इशाराही दिला आहे.
Comments
Post a Comment