कराड : कृष्णा पुलाच्या संरक्षक जाळीसाठी ४०.७९ लाखांचा निधी मंजूर; मनोज माळी यांचे उपोषण स्थगित
कराड शहरातील कृष्णा पुलावरून होणाऱ्या महिला व युवतींच्या आत्महत्यांचे वाढते प्रकार रोखण्यासाठी पुलावर संरक्षक जाळी बसवावी, या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठाणचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी सुरू केलेले चार दिवसांचे अमरण उपोषण शुक्रवारी स्थगित करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या कामासाठी ४० लाख ७९ हजार रुपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाची निविदा प्रसिद्ध केल्याने हा तोडगा निघाला.
राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत महाजन यांनी उपोषण स्थळी भेट देत निधी मंजुरीचे पत्र सादर केले. यावेळी त्यांनी सांगितले की, संरक्षक जाळीसाठी आवश्यक निधी मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
निधी मंजुरीचे पत्र व निविदेची प्रत मिळाल्यानंतर रक्षक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशिल मोझर, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व नगरसेवक विजयसिंह यादव यांच्या हस्ते लिंबू सरबत घेत मनोज माळी यांनी उपोषण सोडले.
उपोषण सुरू असतानाच एका महिलेने कृष्णा पुलावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या गंभीर सामाजिक प्रश्नाची दखल घेत तातडीच्या निधीतून संरक्षक जाळीसाठी मंजुरी दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, नगरसेवक प्रविण पवार, अल्ताफ शिकलगार, नरेंद्र लिबे, प्रितम यादव, विनायक कदम, निषांत ढेकळे, राहुल खराडे, नायब तहसीलदार बाबूराव राठोड तसेच रक्षक प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, कृष्णा पुलावरील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या स्ट्रीटलाइटबाबत येत्या दोन दिवसांत नगरपालिकेत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी दिली. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रीटलाइट तातडीने सुरू करणे आवश्यक असून संबंधित ठेकेदार व महामार्ग प्रशासनाला बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पंधरा दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर जाळी ठोकण्याचा इशारा रक्षक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशिल मोझर यांनी दिला आहे.
कृष्णा पुलावरून होणाऱ्या आत्महत्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर सामाजिक स्वरूपाचा असल्याने या आंदोलनाला अॅड. पदमजा लाड व अॅड. मिलिंद लाड या वकील दाम्पत्याने सक्रिय पाठिंबा दिला. मनोज माळी यांच्या उपोषणकाळात त्यांनी चार दिवस धरणे आंदोलनात सहभाग घेतला.
Comments
Post a Comment