कृष्णा नदीत उडी घेऊन युवतीचे प्राण वाचवणाऱ्या शुभम चव्हाण यांचा नगरपालिकेत जाहीर सत्कार

 कराड: विद्या मोरे 

“माणुसकी अजून जिवंत आहे” हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी घटना खेड येथे घडली असून, कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारलेल्या एका युवतीचे प्राण वाचवून शुभम अशोक चव्हाण (वय ३०) यांनी समाजासमोर धाडस, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे आदर्श उदाहरण उभे केले आहे.
मूळ गाव वांगणी वाडी, पुणे असलेले व सध्या खेड, सातारा येथे वास्तव्यास असलेले शुभम चव्हाण हे सदर घटनेवेळी योगायोगाने त्या ठिकाणी उपस्थित होते. युवतीने पुलावरून नदीत उडी घेतल्याचे लक्षात येताच, क्षणाचाही विलंब न करता आणि स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता शुभम यांनी थेट कृष्णा नदीत उडी घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी त्या युवतीला सुरक्षितपणे बाहेर काढून तिचे प्राण वाचवले.

या धाडसी आणि माणुसकीच्या कार्याची दखल घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री राजेंद्रसिंह यादव यांनी शुभम चव्हाण यांना नगरपालिकेत विशेष निमंत्रित करून यथोचित सत्कार केला. हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा नसून, समाजातील माणुसकी, धैर्य आणि सामाजिक बांधिलकीचा सन्मान असल्याचे यावेळी नगराध्यक्षांनी सांगितले.

या सत्कारप्रसंगी नगरसेवक श्री पोपटराव साळुंखे, श्री प्रवीण पवार, श्री अल्ताफभाई शिकलगार, श्री सुहास पवार, श्री विनायक कदम तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री मोहन कदम, श्री गणेश पवार, श्री नरेंद्र लिबे, श्री निशांत ढेकळे, श्री रुपेश मुळे व श्री महेश चन्ने उपस्थित होते.

या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत श्री मोहन कदम यांनी शुभम चव्हाण यांना नवीन कपडे भेट देऊन त्यांच्या धाडसी कार्याचा गौरव केला. उपस्थित मान्यवरांनी शुभम यांच्या कार्याचे कौतुक करत, अशा युवकांमुळे समाज अधिक सुरक्षित आणि संवेदनशील बनतो, असे मत व्यक्त केले.

शुभम चव्हाण यांच्या या कृतीमुळे अनेक युवकांना संकटसमयी धैर्याने व माणुसकीने पुढे येण्याची प्रेरणा मिळाली असून, त्यांचे कार्य संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार