कराड तालुक्यात उमेदवारी अर्जांना मोठा प्रतिसाद; २३९ अर्जांची विक्री, जिल्हा परिषदेसाठी पहिला अर्ज दाखल
कराड | विद्या मोरे
जिल्हा परिषद आणि कराड पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यात राजकीय हालचाली वाढल्या असून निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. उमेदवारी अर्जांची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना, तांबवे जिल्हा परिषद गटातून विश्वास बाबुराव मोहिते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यात शुक्रवारी ११८ तर शनिवारी २३९ असे एकूण ३५७ उमेदवारी अर्ज इच्छुकांनी घेतले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्रात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्ज घेणाऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता आगामी दिवसांत मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने काटेकोर तयारी केली आहे. अर्ज स्वीकारणे, छाननी, माघार आणि मतदान प्रक्रियेबाबत आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठीही दक्षता घेतली जात आहे. यामुळे कराड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.
पत्रकार-संपादक विश्वास मोहिते यांचा जिल्हा परिषदेसाठी अर्ज
दैनिक तिरंगा रक्षक व क्रांतिकारी जय भीम या वृत्तपत्रांचे संपादक, आदर्श माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच झुंजार पत्रकार म्हणून परिचित असलेले विश्वासराव मोहिते यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी या निवडणुकीसाठी नियोजनपूर्वक तयारी केली असून, त्यांच्या प्रवेशामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Comments
Post a Comment