माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या उपस्थितीत राजकीय ताकद उघड; वारुंजीत काँग्रेसचे दमदार शक्तीप्रदर्शन, तीन उमेदवारांचे अर्ज भरले

 
कराड : विद्या मोरे 
वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली संघटनात्मक व राजकीय ताकद उघड करत दमदार शक्तीप्रदर्शन केले. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीतून काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून हजारो काँग्रेस कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे संपूर्ण वारुंजी परिसर काँग्रेसमय झाला होता. ढोल-ताशांचा गजर, पक्षाच्या घोषणा आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या रॅलीतून काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद व कार्यकर्त्यांची एकजूट ठळकपणे दिसून आली.

या वेळी वारुंजी जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेस पक्षाकडून सौ. सुनंदा नामदेव पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. तसेच वारुंजी पंचायत समिती गणासाठी रवींद्र बडेकर आणि कोयना वसाहत पंचायत समिती गणासाठी श्रीकांत पाटील यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
या प्रसंगी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा पक्ष असून विकास, सामाजिक न्याय व लोकशाही मूल्यांसाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. वारुंजी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसचे उमेदवार सक्षम व विश्वासार्ह नेतृत्व देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वारुंजी जिल्हा परिषद गटातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य देत काँग्रेस पक्ष काम करेल, असे आश्वासन यावेळी नेत्यांनी दिले.
या दमदार शक्तीप्रदर्शनामुळे वारुंजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाने निवडणूक रणांगणात ठामपणे प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले असून राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार