कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसवण्याच्या मागणीसाठी उपोषण तीव्र; लोकप्रतिनिधींची दखल
कराड : विद्या मोरे
गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहराजवळ असलेल्या कृष्णा पुलावर वाढत्या आत्महत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संरक्षक जाळी बसवण्यात यावी, या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठाणचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी गेल्या तीन दिवसांपासून अमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, बुधवारी आणखी एका महिलेने पुलावरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव तसेच रक्षक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशील मोझर यांनी यामध्ये लक्ष घातले आहे.
कृष्णा पुलावरून महिला व युवतींच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने हा पूल ‘सुसाईड पॉइंट’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. आत्महत्या रोखण्यासाठी संरक्षक जाळी बसवण्याची मागणी रक्षक प्रतिष्ठाणकडून गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने करण्यात येत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी अडीच महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाला लेखी सूचना देऊनही अद्याप अंदाजपत्रकास मंजुरी मिळालेली नाही.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका युवतीने कृष्णा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तर बुधवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने या महिलेला वाचवण्यात यश आले. मात्र, उपोषण सुरू असतानाही अशा घटना घडत असल्याने संतप्त रक्षक प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी व कराडकर नागरिकांनी बुधवारी कृष्णा पुलावर रास्ता रोको आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निषेध नोंदवला.
खासदार उदयनराजेंनी अधिकाऱ्यांना सूचना
घटनेची माहिती मिळताच रक्षक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशील मोझर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खासदार भोसले यांनी महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संरक्षक जाळीच्या अंदाजपत्रकास तातडीने मंजुरी देण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मनोज माळी यांनी दिली.
पालकमंत्र्यांकडूनही तत्काळ कारवाईचे निर्देश
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी उपोषणस्थळी भेट देत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावर पालकमंत्री देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर संरक्षक जाळीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
४० लाख ७९ हजार रुपयांचे अंदाजपत्रक
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन कोल्हापूर व मुंबई येथील महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. कृष्णा पुलावरील आत्महत्यांचे गांभीर्य लक्षात घेता सुमारे ४० लाख ७९ हजार रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंजुरीपत्र मिळेपर्यंत उपोषण सुरूच
दरम्यान, जोपर्यंत संरक्षक जाळीच्या कामास लेखी मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे मनोज माळी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच टप्प्याटप्प्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत गरज भासल्यास रक्षक प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते कृष्णा पुलावरून उड्या मारतील, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment