लोकशाही बळकट करण्यासाठी कराड महसूल प्रशासनाचा पुढाकार; बाईक रॅली, रांगोळी व मंगलाष्टकांनी राष्ट्रीय मतदार जागृती दिन उत्साहात साजरा
कराड : विद्या मोरे
राष्ट्रीय मतदार जागृती दिनाचे औचित्य साधून कराड महसूल प्रशासन व स्वीप (SVEEP) पथकाच्या वतीने लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने विविध जनजागृतीपर उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. बाईक रॅली, मतदान जागृती रांगोळ्या, मंगलाष्टके, मतदान शपथ अशा भरगच्च कार्यक्रमांमुळे कराड शहरात लोकशाहीचा उत्सव साजरा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राष्ट्रीय मतदार जागृती दिनानिमित्त “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” अशा प्रभावी घोषणा देत कराड शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे मतदानाचे महत्त्व, प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. बाईक रॅलीत प्रांताधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
यावेळी मतदान विषयक जनजागृतीसाठी रांगोळ्यांच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. तसेच पारंपरिक मंगलाष्टकांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांमध्ये सकारात्मक जागृती निर्माण करण्यात आली. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करण्याची शपथ घेतली. या उपक्रमांमुळे मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील परीट यांनी केले. महसूल प्रशासन व स्वीप पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment