जबाबदार अधिकाऱ्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; मनोज माळींच्या नेतृत्वाखाली कृष्णा पुलावर रास्तारोको, वाहतूक ठप्प

 
कराड : विद्या मोरे
 कराड शहरानजीक गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा पुलावर वारंवार आत्महत्यांचे प्रकार घडत असतानाही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अद्याप संरक्षण जाळ्या बसवण्यात आलेल्या नाहीत. या गंभीर निष्काळजीपणा विरोधात रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी बुधवारी कार्यकर्त्यांसह कृष्णा पुलावर रास्तारोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनामुळे कराडकडे जाणारी वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली.
दरम्यान, बुधवारी सकाळी कृष्णा पुलावरून एका विवाहित महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी पुलावरून जाणाऱ्या काही युवकांनी प्रसंगावधान राखत थेट नदीत उडी घेत महिलेला बाहेर काढले. तिला तातडीने कराड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर मनोज माळी अधिक आक्रमक झाले. त्यांनी कार्यकर्त्यांसह थेट कृष्णा पुलावर जाऊन सुरू असलेली वाहतूक रोखून धरली. कृष्णा पुलावर महिलांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नसतानाही महामार्ग विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. संरक्षण जाळ्या न बसवणे ही गंभीर बाब असून, यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी माळी यांनी केली.
जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळावरून मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा मनोज माळी यांनी घेतला. या रास्तारोको आंदोलनात नरेंद्र लिबे, नूरभाई पटेल, विकास तुपे, जय सूर्यवंशी, शशीराज करपे, सागर पाटील, सुहास कदम, बंटी मोरे, सचिन कुंभार, शुभम पाटील यांच्यासह रक्षक प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे, कृष्णा पुलावर तातडीने संरक्षण जाळ्या बसवाव्यात, या मागणीसाठी मनोज माळी यांनी मंगळवारपासून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांमध्येही महामार्ग विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार