अभ्यासू व निर्भीड पत्रकारितेचा गौरव; विठ्ठल जाधव यांना राज्यस्तरीय ‘गुंफण’ पुरस्कार

कराड : विद्या मोरे 

सलग पंचवीस वर्षे महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजाचे सातत्यपूर्ण व अभ्यासपूर्ण वार्तांकन करणारे, ज्येष्ठ, निर्भीड व विश्लेषक पत्रकार तथा दैनिक सामनाचे विशेष प्रतिनिधी विठ्ठल जाधव यांना यंदाचा राज्यस्तरीय शंकर पाटील ‘गुंफण’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य व्यासपीठ असलेल्या गुंफण अकादमीच्या वतीने पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोथरूड (पुणे) येथे गुंफण अकादमी व भारतीय शिक्षण संस्था (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.

विठ्ठल दत्तात्रय जाधव हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ, अभ्यासू, निर्भीड व विश्लेषक पत्रकार म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला चार वर्षे लोकसत्तामध्ये पत्रकारिता केल्यानंतर गेल्या ३० वर्षांपासून ते दैनिक सामना, पुणे येथे विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. मुंबई व नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनांचे सलग पंचवीस वर्षे केलेले वार्तांकन हे त्यांच्या पत्रकारितेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

यासोबतच राज्यभरातील मोठ्या राजकीय सभा, जनआंदोलने, शेतकरी चळवळी तसेच निवडणुकांचे प्रभावी व अभ्यासपूर्ण वार्तांकन त्यांनी केले आहे. राजकारण, शेती, सहकार, जिल्हा परिषद, महसूल विभाग तसेच विविध प्रशासकीय कार्यालयांतील बातमीदारी, मुलाखती, लेखन व संपादनाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.

आकाशवाणी व दूरदर्शनसाठी त्यांनी महाराष्ट्र विधिमंडळाचे समालोचन व वृत्तांत सादर केले आहेत. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकराज्यसह विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. तसेच पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र व संज्ञापन पत्रकारिता विभागात मार्गदर्शन व्याख्याते म्हणून त्यांनी योगदान दिले आहे.

संघटनात्मक पातळीवरही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे कार्यवाह तसेच महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केले आहे. राज्य सरकारच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे विश्वस्त असून राज्य सरकारच्या रस्ते सुरक्षा समितीचे तसेच पुणे विभागीय स्वच्छता अभियान समितीचे सदस्य आहेत. पत्रकारितेतील उल्लेखनीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील कार्याबद्दल त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार