उंब्रजच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कराड : विद्या मोरे
उंब्रजच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून येणाऱ्या काळात रस्ते, पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन, पर्यटन व नागरी सुविधांच्या विकासकामांना गती दिली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उंब्रजच्या भविष्याचा फैसला करणारी हीच निवडणूक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कराड तालुक्यातील उंब्रज येथील बाजारपेठ तळावर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उंब्रजला नगरपंचायत दर्जा, घनकचरा व्यवस्थापन, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दळणवळणाच्या सुविधा आणि उड्डाणपूल यांसारख्या प्रलंबित प्रश्नांना वर्षभरात न्याय देण्यात येईल. कर्मभूमी ठाणे-मुंबई असली तरी जन्मभूमी सातारा असून या मातीतले ऋण फेडण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजना देशातील पहिली व महत्त्वाची योजना असून ती कोणीही बंद करू शकणार नाही, असे स्पष्ट करताना त्यांनी गरिबी जवळून पाहिल्याचा अनुभव सांगितला. शब्द दिला की तो पाळायचा, हीच बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला मतदान करून भगवा फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, ही स्व. यशवंतराव चव्हाण यांची भूमी आहे. याच भूमीचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सन्मानासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या ५० लाख रुपयांनंतर उर्वरित १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. नगरपंचायत व्यापारी संकुल, घनकचरा व्यवस्थापन, पाणी प्रश्न व इतर नागरी सुविधा लवकरच मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सभेचे संयोजक व कराड शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी उंब्रजच्या वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. घनकचरा निर्मूलन प्रकल्प, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी वाढीव निधी तसेच तासवडे औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मागण्या त्यांनी मांडल्या.
शिवसेनेचे उमेदवार अॅड. महादेव साळुंखे, नयन निकम, सोमनाथ चव्हाण यांच्यासह पंचायत समिती गणांतील उमेदवार, शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अॅड. महादेव साळुंखे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment