राजकीय इतिहास रचला जाणार! मा.सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध; महाराष्ट्राला पहिली महिला डेप्युटी सीएम
कराड : विद्या मोरे
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या एक ऐतिहासिक पर्व सुरू होणार असून, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. या घडामोडीमुळे राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्या सकाळी 11 वाजता मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची निर्णायक बैठक होणार असून, त्यानंतर सायंकाळी शपथविधी पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार यांचे निकटवर्तीय व राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी उपमुख्यमंत्रिपदा बाबत सविस्तर चर्चा केली असून, या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी पद स्वीकारण्यास संमती दिल्याचे समजते.
या महत्त्वपूर्ण निर्णयापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा झाली असून, बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम सहमती झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
जर उद्या शपथविधी झाला, तर हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. आतापर्यंत महिला मुख्यमंत्री लाभल्या असल्या, तरी उपमुख्यमंत्रि पदावर पहिल्यांदाच महिला विराजमान होणार असल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व आहे.
आता संपूर्ण राज्याचे लक्ष उद्याच्या बैठकीकडे आणि त्यानंतर होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.
Comments
Post a Comment