कराडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार; शहरविकासाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

 कराड : विद्या मोरे 

कराड : कराड नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष मा.श्री राजेंद्रसिंह यादव यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक श्री. माधवराव पवार यांच्या हस्ते नगराध्यक्ष यादव यांचा हा गौरव समारंभ संपन्न झाला.

या प्रसंगी कराड शहरातील नागरी सुविधांचा विकास, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा उभारणी यांसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. कराड शहराच्या अडीअडचणींची जाण असणारे नेतृत्व नगराध्यक्षपदी लाभल्याबद्दल उपस्थित माजी नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले. तसेच शहरविकासासाठी माजी नगरसेवक संघटना नेहमीच नगराध्यक्षांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

नगराध्यक्ष श्री. राजेंद्रसिंह यादव यांनीही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वय, संवाद व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. नागरिकहिताचे निर्णय पारदर्शक पद्धतीने घेऊन कराड शहराला एक आदर्श नगरपालिकेचे रूप देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले. तसेच माजी नगरसेवकांचे अनुभव व मार्गदर्शन वेळोवेळी लाभावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या वेळी श्री. सतिश पाटील, श्री. प्रदीप जाधव, श्री. अबासाहेब हिंगमिरे, श्री. दीपक पेंढारकर, श्री. बाळासो उमराणी, श्री. हरीष जोशी, श्री. घनश्याम पेंढारकर, श्री. अशोक पाटील, श्री. आनंदराव लादे आदी माजी नगरसेवक उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार