साताऱ्याच्या फेऱ्यांतून अपंगांची सुटका कधी?कराड उपजिल्हा रुग्णालयातच प्रमाणपत्र द्या . नगरसेविका अनिता पवार– पोळ यांची ठाम मागणी
कराड : विद्या मोरे
कराड व पाटण तालुक्यातील शारीरिक अपंगत्व असलेल्या नागरिकांना मतिमंदत्व, कर्णबधीर, मुकबधीर तसेच अंधत्वाची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात वारंवार जावे लागत आहे. या प्रवासामुळे अपंग व्यक्तींसह त्यांच्या नातेवाईकांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणावर खर्ची पडत असून, अनेकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. हा अन्यायकारक प्रकार तातडीने थांबवावा, अशी जोरदार मागणी नवनिर्वाचित नगरसेविका अनिता प्रभाकर पवार– पोळ यांनी केली आहे.
कराड उपजिल्हा रुग्णालयातच अपंगत्व प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू करावी, यासाठी त्यांनी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांना लेखी निवेदन सादर केले आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून अपंग नागरिकांना दिलासा देणारी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
या निवेदनाची प्रत नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व नगरसेवक विजयसिंह यादव यांनाही देण्यात आली असून, त्यांनी या मागणीस पाठिंबा दर्शविला आहे. शासनदरबारी पाठपुरावा करून ही न्याय्य मागणी मान्य करून घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कराड व पाटण तालुक्यातील अपंग नागरिकांची संख्या मोठी असून, साताऱ्याचा प्रवास अनेकांसाठी अशक्यप्राय ठरत आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन दिवस तरी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती कराड उपजिल्हा रुग्णालयात असावी. यामुळे अपंगत्व प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभ होऊन लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.
हे निवेदन सादर करताना मुंढे गावचे सरपंच सुमित साळवे, शुभम शिंदे, प्रतीक पोतदार, तुषार पोळ, अक्षय पवार, अक्षय पवार मित्रपरिवार तसेच अजंठा ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment