ज्याचं नेतृत्व माणुसकीवर उभं आहे, जनतेच्या सुख-दुःखातला माणूस : रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस जनतेच्या आशीर्वादात साजरा होणार
कराड : विद्या मोरे कराड उत्तर परिसरासाठी १० जानेवारी हा दिवस केवळ एका लोकनेत्याचा वाढदिवस नसून, सामाजिक बांधिलकी, निष्ठा आणि विश्वासाचा उत्सव ठरतो. संघर्षातून उभे राहून समाजकारण व राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मा. श्री. रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस परिसरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा होतो.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बालपण गेलेल्या रामकृष्ण वेताळ यांनी प्रतिकूल परिस्थितीशी कधीही तडजोड न करता मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाचा मार्ग घडवला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही आई-वडिलांकडून मिळालेल्या सामाजिक संस्कारांमुळे स्वाभिमान जपून जगण्याचा संस्कार त्यांनी लहानपणापासूनच आत्मसात केला.
कोणत्याही आर्थिक पाठबळाविना त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीचा काळ संघर्षाचा असला, तरी शॉर्टकटचा मार्ग न स्वीकारता त्यांनी कठोर परिश्रमाच्या बळावर ‘आनंद इलेक्ट्रिकल’ या व्यवसायाला विश्वासार्हतेचे स्थान मिळवून दिले. आज हा व्यवसाय परिसरात दर्जेदारg सेवा आणि प्रामाणिक व्यवहाराचे प्रतीक मानला जातो.
व्यवसायात स्थैर्य प्राप्त केल्यानंतर केवळ वैयक्तिक यशापुरते न थांबता समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव त्यांनी कृतीतून दाखवली. याच भावनेतून त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची सुरुवात झाली. ग्रामपातळीवर उपसरपंच म्हणून काम करताना पाणीपुरवठा, रस्ते, वीज आणि इतर मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
भारतीय जनता पक्षात सक्रिय भूमिका स्वीकारल्यानंतर कराड उत्तर परिसरात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्या काळात पक्षाची स्थिती तुलनेने कमकुवत असतानाही त्यांनी वाडी-वस्ती पिंजून काढत कार्यकर्ते जोडले, सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला आणि मजबूत संघटनात्मक बांधणी केली.
आज कराड उत्तरमध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळणारे यश हे अचानक घडलेले नसून, वर्षानुवर्षांच्या नियोजनबद्ध मेहनतीचे फलित असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. निवडणूक नियोजन व व्यवस्थापनातील त्यांच्या भूमिकेची दखल विरोधकांकडूनही घेतली जाते. त्यामुळेच अनेकदा त्यांचे नाव ‘किंगमेकर’ म्हणून चर्चेत येते.
राजकीय कार्यासोबतच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. लाडकी बहीण योजना, बांधकाम कामगारांना साहित्य वाटप, मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी प्रत्यक्ष पाठपुरावा केला.
किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस, बाजार समिती संचालक, जिल्हा उपाध्यक्ष, लोकसभा समन्वयक, भाजपा महाराष्ट्र प्रदेश संचालन समिती सदस्य तसेच कृषी क्षेत्र समन्वयक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. पदे बदलली, जबाबदाऱ्या वाढल्या; मात्र त्यांचा साधेपणा आणि सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद कायम राहिला.
आजही रामकृष्ण वेताळ यांचा दिनक्रम समाजकारण आणि राजकारणाभोवतीच फिरताना दिसतो. भविष्यातही कराड उत्तरसह संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते कार्यरत राहतील, असा विश्वास कार्यकर्ते व नागरिक व्यक्त करत आहेत.
संघर्षातून उभे राहून विश्वासाचे नेतृत्व घडवणाऱ्या रामकृष्ण वेताळ यांना वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment