कराडमध्ये ईव्हीएम मशिन सिलिंग प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण .उमेदवार व प्रतिनिधींच्या उपस्थितीत शासकीय धान्य गोदामात कामकाज
कराड : विद्या मोरे
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिन्सची सिलिंग प्रक्रिया कराड येथील शासकीय धान्य गोदाम, भेदा चौक येथे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली.
निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी ८.३० वाजता नियुक्त शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी समोरच स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी ईव्हीएम मशिन्सची रचना, मतपत्रिका, मशिन जोडणी, सील प्रक्रिया व सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या. यावेळी उमेदवार व प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचे त्यांनी समाधानकारक निरसन केले.
सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष मशिन सिलिंग प्रक्रियेस प्रारंभ झाला. या प्रक्रियेसाठी ५० टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक टेबलवर एक सेक्टर अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली होती. हे कामकाज सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत सुरू होते तसेच दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले.
या प्रक्रियेत ४८६ मतदान केंद्रांसाठी वापरण्यात येणाऱ्या ४८६ ईव्हीएम मशिन्स तसेच आपत्कालीन वापरासाठी ५० राखीव मशिन्स तयार करण्यात आल्या. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नमुना मतदान घेऊन सीआरसी (कंट्रोल, बॅलेट व व्हीव्हीपॅट) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मशिन्स योग्य कार्यरत असल्याची खात्री झाल्यानंतर त्या उमेदवारांच्या समक्ष सील करून कडेकोट बंदोबस्तात स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या.
सदर स्ट्रॉंगरूम दिनांक ६ फेब्रुवारी रोजी उघडून ईव्हीएम मशिन्स प्रत्यक्ष मतदानासाठी संबंधित मतदान केंद्रांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
दरम्यान, दिवसभर चाललेल्या या सिलिंग प्रक्रियेची निवडणूक निरीक्षक श्रीमती सुषमा सातपुते यांनी भेट देऊन पाहणी केली. संपूर्ण कामकाज नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, प्रताप पाटील, नायब तहसीलदार विश्वजीतसिंह राजपूत, महेश उबारे, हेमंत बेसके, बाबुराव राठोड आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सहाय्यक महसूल अधिकारी गोपाल वसु, महसूल सहाय्यक प्रवीण साळुंखे, शिवराज माळी, प्रवीण तुपे, स्वप्निल नलवडे यांनी सिलिंग प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. व्यवस्थापन व मीडिया सेलचे अक्षय सपाटे यांनी संपूर्ण कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
इतर महत्त्वाची माहिती
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण शनिवार, दिनांक ३१ जानेवारी व रविवार, दिनांक १ फेब्रुवारी रोजी टाऊन हॉल, कराड येथे आयोजित करण्यात आले आहे.
तसेच कराड तालुक्यातील नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी विठामाता विद्यालय, कराड येथे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, संबंधित कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment