जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 साठी मतमोजणी यंत्रणा सज्ज सायंकाळी पाच पर्यंत सर्व निकाल जाहीर होणार : निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे
कराड : विद्या मोरे
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर सर्व मतमोजणीसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अतुल म्हेत्रे यांनी सांगितले की, मतमोजणी कामासाठी एकूण 230 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनवरील मतमोजणीसाठी 24 टेबल तर टपाली मतमोजणीसाठी 12 स्वतंत्र टेबल सज्ज ठेवण्यात आले आहेत. टपाली मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होणार असून ईव्हीएमद्वारे मतमोजणी 10.15 वाजता सुरू केली जाणार आहे.
प्रत्येक मतमोजणी टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक व एक चतुर्थश्रेणी कर्मचारी अशा तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकाच वेळी 12 गट व त्याअंतर्गत येणाऱ्या गणांची मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून प्रत्येक गटासाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नेमण्यात आले आहेत.
निकालासाठी विविध गटांमध्ये वेगवेगळ्या फेऱ्या होणार आहेत. त्यामध्ये पाल गटासाठी 25, उंब्रज 22, मसूर 23, कोपर्डे हवेली 20, सैदापूर 20, वारुंजी 19, तांबवे 20, विंग 19, कार्वे 21, रेठरे बु. 23, काले 22 तर येळगाव गटासाठी 24 फेऱ्या होणार असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण रविवारी दुपारी पार पडले. यावेळी मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक, पारदर्शक व निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पार पाडण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
Comments
Post a Comment