डॉ. चंद्रकांत माने यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आठवणींची शिदोरी’ व्याख्यानासह वाढदिवस समारंभ
कराड : विद्या मोरे
कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जानेवारी महिन्यात जन्मदिवस असलेल्या सदस्यांचे वाढदिवस उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाला संघातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी अजित दादा यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की अशा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आपुलकी, संवाद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
जानेवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या श्री. संतोष जगताप, श्री. विलासराव कुंभार, श्री. प्रकाश सगरे, श्री. शकील बागवान आणि श्री. यशवंत कोळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सौ. विद्या मोरे यांचा उपस्थित राहिल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणी सौ. फरजाना इकबाल यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी “आठवणींची शिदोरी” या विषयावर हृदयस्पर्शी व्याख्यान दिले. जीवनातील आठवणी, अनुभव, नातेसंबंध आणि मूल्ये जपण्याचे महत्त्व त्यांनी प्रभावी पद्धतीने मांडले. व्याख्यानाने उपस्थित ज्येष्ठ नागरिक भावूक झाले तसेच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी माननीय अशोकराव पाटील (दादा) यांनी आभार प्रदर्शन करून सर्व पदाधिकारी, सदस्य, प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. सत्कार समारोपानंतर श्री. यशवंत कोळी आणि श्री. प्रकाश सगरे यांनी उपस्थितांना अल्पोपहार दिला.
आनंद, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
Comments
Post a Comment