कराड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज; ४८६ मतदान पथके साहित्यांसह केंद्रांकडे रवाना

 कराड : विद्या मोरे 
कराड तालुक्यात शनिवार, दिनांक ७ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली असून मतदानाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कराड तालुक्यातील एकूण ४८६ मतदान पथकांमधील कर्मचारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर आवश्यक मतदान साहित्यांसह आत्मविश्वासाने आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले.
मतदान प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मतदान कर्मचाऱ्यांना तिसऱ्या प्रशिक्षण सत्रात सविस्तर मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व नियमबद्ध पद्धतीने पार पाडावी, तसेच मतदारांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, अति. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, क्षेत्रीय अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शनानंतर मतदानासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी साहित्याची सखोल तपासणी करून खात्री केली व त्यानंतर सर्व कर्मचारी आपल्या-आपल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले.
मतदान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी प्रशासनामार्फत ६६ एसटी बस, १८ मिनी बस व ८ जीप अशा वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक शांततेत, पारदर्शक व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

मतदान पथकांसोबत मेडिकल किट आणि मच्छर अगरबत्ती

निवडणूक कर्तव्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्री शांत झोप मिळावी व दिवसभर उत्तम कामकाज करता यावे, यासाठी प्रत्येक मतदान पथकास मच्छरांपासून संरक्षण म्हणून मच्छर अगरबत्ती देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल बॉक्स देण्यात आला असून, त्यामध्ये कोणत्या आजारासाठी कोणती गोळी वापरावी याची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे.
प्रत्येक मतदान केंद्राध्यक्षांनी दीड दिवस ‘डॉक्टर’ बनून आपल्या पथकाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिले. त्यांच्या या अभिनव निर्णयाला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली. आरोग्याची विशेष काळजी घेणारे अतुल म्हेत्रे हे आजपर्यंतचे एकमेव निवडणूक निर्णय अधिकारी असल्याची चर्चा यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये होताना दिसून आली.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार