कराड तालुक्यात शांततेत व निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार; ६९.३४ टक्के मतदानाची नोंद
कराड : विद्या मोरे
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने कराड तालुक्यातील सर्व ४८६ मतदान केंद्रांवर आज काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत, निर्भय वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे व प्रभावी अंमलबजावणीमुळे निवडणूक प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यात एकूण ६९.३४ टक्के मतदान झाले आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते. आज सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या दोन तासांत म्हणजे ९.३० वाजेपर्यंत केवळ ७.२३ टक्के मतदान झाले होते. या कालावधीत पुरुष मतदारांचा सहभाग स्त्री मतदारांच्या तुलनेत अधिक असल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी २१.६३ इतकी झाली. दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ३७.५४, तर सायंकाळी ३.३० वाजेपर्यंत ५२.२० टक्के मतदान झाले होते. संध्याकाळच्या सत्रात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढल्याचे दिसून आले. अखेर मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यात एकूण १,४६,०४५ पुरुष, १,३५,८७९ स्त्रिया व ४ इतर अशा एकूण २,८१,९२८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत लोकशाहीच्या उत्सवाची यशस्वी सांगता केली. निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडल्याबद्दल प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment