अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणीरक्षक प्रतिष्ठानचे निवेदन; सात दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
कराड : विद्या मोरे
हर्षदा विक्रम शिंदे (वय १६, इयत्ता दहावी) या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. संबंधित विद्यार्थिनीला प्रथमेश रमाकांत झुंजुर्णे याने शाळेत ये-जा करताना सतत मानसिक त्रास दिल्यामुळे तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी कोरेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र तक्रार दाखल होऊनही अद्याप आरोपीस अटक करण्यात आलेली नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
रक्षक प्रतिष्ठानचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज बंडा माळी यांनी कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक मा. राजश्री तेरणा पाटील यांना निवेदन देऊन आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच आरोपीच्या आई-वडिलांकडून पीडित कुटुंबीयांना घरी तसेच शेतात जाऊन प्रकरण मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
आरोपीस येत्या सात दिवसांत अटक न झाल्यास कोरेगाव पोलीस स्टेशनसमोर पीडित कुटुंबीयांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रक्षक प्रतिष्ठानतर्फे देण्यात आला आहे.
यावेळी सातारा नगरपरिषद नगरसेवक गुरुदेव कांबळे, जिल्हा संघटक सुशील जाधव, तन्वीर शेख, तोषिफ शेख, आरिफ शेख, आकाश सणस, अविष्कार जाधव, अजिंक्य देवकर तसेच पीडित कुटुंबीय उपस्थित होते.
Comments
Post a Comment