कराड नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय : यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी २०२६–२७ च्या पहिल्या अर्थसंकल्पीय सभेचा शुभारंभ
कराड : विद्या मोरे
कराड नगर परिषद ने आपल्या इतिहासात प्रथमच एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. थेट नगराध्यक्षपदी निवडून आलेले राजेंद्रसिंह यादव यांच्या पुढाकारातून नगरपरिषदेची पहिली विशेष सभा तसेच नव्याने निवडून आलेल्या सर्वसाधारण सभेची पहिली अर्थसंकल्पीय सभा शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात घेण्यात येणार आहे.
कराडची ऐतिहासिक आणि राजकीय परंपरा
सातारा जिल्ह्यातील कराड हे कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमावर वसलेले ऐतिहासिक शहर आहे. “प्रीतिसंगम” म्हणून ओळखला जाणारा हा संगम केवळ भौगोलिक नव्हे तर सांस्कृतिक आणि भावनिक दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो. शिक्षण, सहकार, सामाजिक चळवळी आणि राजकारण यांमध्ये कराडने राज्याला अनेक नेतृत्वे दिली आहेत.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेची पहिली अर्थसंकल्पीय सभा एका ऐतिहासिक स्मृतिस्थळी घेण्याचा निर्णय हा शहराच्या परंपरेला साजेसा आणि मूल्यप्रधान असा मानला जात आहे.
यशवंतराव चव्हाण : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण (१९१३–१९८४) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर त्यांनी राज्याच्या प्रशासनाला स्थैर्य आणि विकासाची दिशा दिली.
पुढे त्यांनी भारताचे संरक्षणमंत्री, अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्री म्हणून देशपातळीवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. सहकार चळवळ, ग्रामीण विकास, औद्योगिक प्रगती आणि शिक्षण क्षेत्रातील धोरणांमुळे आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान मानले जाते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांना “स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक” म्हणूनही गौरविले जाते. कराड ही त्यांची कर्मभूमी असून कृष्णा-कोयना संगम परिसरातील त्यांचे समाधीस्थळ राज्याच्या राजकीय इतिहासात विशेष स्थान राखते.
प्रशासकीय राजवटीतून लोकशाहीकडे
सन २०२२ पासून कराड नगरपालिकेवर प्रशासक राज लागू होता. जवळपास चार वर्षांनंतर आता नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष व नगरसेवक लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून कार्यभार स्वीकारत आहेत. या नव्या पर्वाची सुरुवात एका आदर्श नेत्याच्या स्मृतीला अभिवादन करून करण्याचा निर्णय हा लोकशाही मूल्यांना अधोरेखित करणारा मानला जात आहे.
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले,
“आपण कोणतेही शुभ कार्य सुरू करताना आई-वडील आणि थोर व्यक्तींना वंदन करतो. अखंड महाराष्ट्राचे आदर्श असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली कराड नगरपरिषदेच्या कारभारास प्रारंभ करण्यात येणार आहे.”
सर्वत्र स्वागत
या निर्णयावेळी उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, नगरसेवक जयंतकाका पाटील तसेच मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर उपस्थित होते. विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून हा निर्णय कराडच्या राजकीय परंपरेला साजेसा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना अभिवादन करत २०२६–२०२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय सभेची सुरुवात होणार असल्याने कराडकरांमध्ये उत्सुकता आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा निर्णय कराडच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
Comments
Post a Comment