पत्र म्हणजे काळजाचा तुकडा” : पत्र प्रवासातून उजळल्या कराडच्या ज्येष्ठांच्या आठवणी
कराड : विद्या मोरे
भारतीय डाक विभाग व ज्येष्ठ नागरिक संघ, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल कृष्णा पॅलेस येथे “पत्राचा प्रवास व डाक विभागाच्या विविध योजना” या विषयावर सविस्तर मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहात पार पडले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड डाक विभागाच्या अधीक्षिका स्वाती दळवी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख उपस्थित होते. प्रारंभी गटप्रमुख सयाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात पत्रसंस्कृती जपणे आणि डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश खोचीकर यांनी आभार प्रदर्शन केले.
डाक योजनांची सविस्तर माहिती
अध्यक्षीय भाषणात स्वाती दळवी यांनी डाक विभागाच्या विविध सेवा व योजनांची माहिती दिली. पत्राचा प्रवास कसा होतो, एका टपालपेटीत टाकलेल्या पत्रापासून ते प्राप्तकर्त्याच्या हातात पोहोचेपर्यंतच्या प्रक्रियेचे त्यांनी सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले. पिनकोडचे महत्त्व, वर्गीकरण प्रक्रिया, वितरण व्यवस्था याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी डाक यंत्रणेची अचूकता आणि विश्वासार्हता अधोरेखित केली.
याशिवाय आधार सेवा, जीवन प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक प्राप्ती योजना, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी योजना, ‘माय स्टॅम्प’ योजना तसेच तिकीट संग्रह या विषयांवर त्यांनी माहिती दिली. डाक विभागाच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणूक, विमा, बचत व सामाजिक सुरक्षेच्या सुविधा नागरिकांना सहज उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
“पत्र म्हणजे भावना”
प्रमुख पाहुणे अमित देशमुख यांनी आपल्या मनोगतात पत्रांचे भावनिक महत्त्व अधोरेखित केले. “पत्र हे केवळ कागदाचा तुकडा नसून काळजाचा तुकडा असतो,” असे सांगत त्यांनी जुन्या काळातील पत्रव्यवहाराच्या आठवणी जागवल्या. पोस्टमनची आतुरतेने वाट पाहणे, गावातील टपालपेटी, पोस्टकार्ड व आंतरदेशीय पत्रांची उत्सुकता या आठवणींनी सभागृहातील वातावरण भावनिक झाले.
डाक सेवा ही केवळ व्यवहारापुरती मर्यादित नसून ती जनसेवेचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे ते म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्पर्धेतही डाक विभाग विश्वासार्हता टिकवून ठेवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आठवणींना उजाळा
कार्यक्रमादरम्यान अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यातील पत्रांशी निगडित आठवणी शेअर केल्या. शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी दूर गेलेल्या मुलांकडून आलेली पत्रे, सणासुदीच्या शुभेच्छा, सैन्यातील नातेवाईकांची पत्रे अशा विविध आठवणींना उजाळा मिळाला. काहींनी पत्र जपून ठेवण्याची सवय आजही कायम असल्याचे सांगितले.
पत्रलेखनाची परंपरा जपण्याची गरज व्यक्त करताना उपस्थितांनी अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन पुढेही करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमास डाक विभागातील हनुमंत वेदपाठक, श्रीनिवास सोनवणे, प्रवीण माने तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व माहितीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
Comments
Post a Comment