हिंदू-मुस्लिम ऐक्य जपणारा समाजसेवेचा चेहरा हरपला : उस्मानगणी मुल्ला यांचे निधन

कराड : विद्या मोरे

 शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कम्युनिस्ट विचारसरणीचे आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरलेले हा. उस्मानगणी अल्ली मुल्ला (वय ७८) यांचे आज सायंकाळी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने कराड शहरासह सातारा जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून एक आधारवड हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शहरातील भाजी मंडई परिसरातील चांदणी चौक येथे ते आपल्या परिवारासह वास्तव्यास होते. शाही ईदगाह कब्रस्तान ट्रस्टचे ट्रस्टी तथा सामाजिक कार्यकर्ते साबीरमिया मुल्ला यांचे ते वडील होत.

उस्मानगणी मुल्ला यांनी अत्यंत कमी वयातच मुस्लिम समाजातील सामाजिक व धार्मिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. कराड शहरात दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या मोहरम तसेच मोहम्मद पैगंबर जयंती उत्सवाच्या आयोजनात त्यांनी मोलाचे योगदान दिले. दिवंगत कॉम्रेड बादशाहभाई मुल्ला यांच्या पश्चात या उत्सवांचे नेतृत्व त्यांनी समर्थपणे सांभाळले आणि उत्सव अधिक शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण पद्धतीने पार पाडले.

संपूर्ण सातारा जिल्ह्यात मुस्लिम समाजातील दफनविधींमध्ये त्यांनी तरुण वयापासून पुढाकार घेतला. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती मदत करण्याची त्यांची वृत्ती सर्वश्रुत होती. कम्युनिस्ट विचारसरणीशी निष्ठा ठेवत त्यांनी समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी सुसंवाद ठेवला. सामाजिक प्रश्न सोडवणे, वाद मिटवणे आणि समाजात ऐक्याचे वातावरण राखणे यासाठी ते नेहमीच पुढे असत.

त्यांच्या कार्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजात त्यांचा मोठा मित्रपरिवार निर्माण झाला होता. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जोपासण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.

दरम्यान, त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शहरात शोककळा पसरली आहे. विविध सामाजिक, धार्मिक व व्यापारी संघटनांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्यावर उद्या, गुरुवारी सकाळी ६.३० वाजता येथील ईदगाह मैदानात दफनविधी (अंत्यसंस्कार) करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून व दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

त्यांचे चिरंजीव साबीरमिया मुल्ला हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून शाही वक्त कब्रस्तान कमिटीचे संचालक तसेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. समाजातील विविध घटकांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून हिंदू-मुस्लिम ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी तेही सातत्याने कार्यरत आहेत.

उस्मानगणी मुल्ला यांच्या निधनाने कराडच्या सामाजिक क्षेत्रातील एक समर्पित, संयमी व सेवाभावी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार