कवठे (ता. कराड) येथील श्री जोतिर्लिंग विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन कार्यक्रम“ यश हे सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनावर आधारित” – माजी सैनिक शिवाजीराव माने

 कराड : विद्या मोरे

कवठे (ता. कराड) येथील श्री जोतिर्लिंग विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन कार्यक्रम तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माजी सैनिक तथा उद्योजक शिवाजीराव माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिवाजीराव माने म्हणाले की, यश हे केवळ गुणांवर अवलंबून नसून अभ्यासातील सातत्य, कठोर मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यावर आधारित असते. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे. वेळेचे योग्य नियोजन, नियमित अभ्यास आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास अपेक्षित यश नक्कीच मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाम-शरद शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनिलराव पाटील होते. यावेळी जि. प. सदस्य लालासाहेब जगदाळे, पं. स. सदस्या सौ. कोमल यादव, डॉ. संतोष पाटील, केंद्र प्रमुख गणेश जाधव, उपाध्यक्ष दादासाहेब साळुंखे, जेष्ठ संचालक पांडुरंग यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवनिर्वाचित जि. प. सदस्य लालासाहेब जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना “मी करू शकतो” हा सकारात्मक विचार मनात ठेवून अभ्यासाबरोबरच व्यायामाकडेही लक्ष देण्याचा सल्ला दिला. शिक्षकांचा आशीर्वाद, पालकांचे प्रेम, स्वतःची मेहनत, आत्मविश्वास आणि चिकाटी या गुणांमुळेच यश संपादन करता येते, असे त्यांनी नमूद केले.

संस्थेचे अध्यक्ष सुनिलराव पाटील यांनी परीक्षा ही नव्या संधीची सुरुवात असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे आणि विद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखावी, असे आवाहन केले.

यावेळी काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांनी केले, सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक दिलीप माने यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्रप्रसाद चव्हाण यांनी मानले.


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार