मा. राजेंद्रसिंह यादव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; कराड नगरपरिषदेच्या विकासकामांसाठी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर
कराड : विद्या मोरे
लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. राजेंद्रसिंह यादव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रभावी मांडणी आणि संबंधित विभागांशी केलेल्या सातत्यपूर्ण समन्वयामुळे कराड नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसाठी जिल्हास्तर नगरोत्त्थान महाभियान अंतर्गत एकूण ८८ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
ही मान्यता सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आली. सदर बैठक पालकमंत्री मा. शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीदरम्यान कराड शहराच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
कराड नगरपरिषद प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, मंजूर निधीतून शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा, गटारी बांधकाम, सार्वजनिक सुविधा उभारणी तसेच अन्य मूलभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित कामांना अधिकृत मान्यता देण्यात आली असून, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.
नगराध्यक्ष मा. राजेंद्रसिंह यादव यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. विविध विभागांशी संवाद साधत आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या निधीस गती मिळाल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.
या विकासकामांमुळे कराड शहरातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून शहराच्या नियोजित आणि शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे. आगामी काळातही शहराच्या प्रगतीसाठी विविध योजनांचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.
Comments
Post a Comment