कराड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियानाची तयारी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक
कराड:विद्या मोरे
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा क्र. १) राबविण्यात येणार असून त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कराड येथे नियोजन बैठक पार पडली.
महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक मराअ-२०२६ प्र.क्र.०९ समन्वय-१, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ अन्वये हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार कराड तालुक्यातील १२ मंडळांमध्ये प्रत्येकी दोन प्रमाणे २४ शिबिरे, तसेच कराड व मलकापूर नगरपरिषद हद्दीत प्रत्येकी दोन प्रमाणे ४ शिबिरे आयोजित करण्यात येणार असून एकूण २८ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या शिबिरांच्या पूर्वतयारीसाठी सोमवार, दिनांक २ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य, कराड पंचायत समिती सदस्य, कराड व मलकापूर नगरपरिषदांचे नगराध्यक्ष व नगरसेवक, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महसूल सेवक तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत उपविभागीय अधिकारी, कराड यांनी चित्रफितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ याबाबत सविस्तर माहिती दिली. सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच महसूल विषयक प्रलंबित कामे जलदगतीने मार्गी लागावीत यासाठी सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिबिरांमध्ये होणारी प्रमुख कामे
या शिबिरांमध्ये नागरिकांच्या विविध महसूल विषयक कामांचा निपटारा करण्यात येणार असून त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे :
७/१२ उताऱ्यातील चुका दुरुस्त करून वितरण
सामाजिक व आर्थिक सहाय्य योजनांसाठी अर्ज स्वीकृती व मंजुरी आदेशांचे वितरण
प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांची गावनिहाय माहिती संकलन
अनोंदणीकृत व्यवहारांची माहिती घेऊन नोंदणी विभागाकडे प्रस्ताव पाठविणे
७/१२ उतारे अद्ययावत करून वाटप
विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वितरण
पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देणे
सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत शिल्लक लाभार्थ्यांची यादी तयार करून भूखंड वाटप
वादग्रस्त फेरफार प्रकरणे निकाली काढणे
डिजिटल ७/१२ व ८अ उतारे उपलब्ध करून देणे
उत्पन्न, रहिवासी, अधिवास, जात, नॉन-क्रीमीलेअर आदी प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकृती व वितरण
तसेच शासनाच्या नव्या सुधारणांनुसार कलम ४२अ, ४२ब, ४२क व ४२ड या तरतुदी रद्द करण्यात आल्याने सनद देण्याची प्रक्रिया समाप्त झाली असून याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. ज्यांना अद्याप सनद मिळालेली नाही अशा जुन्या प्रकरणांची माहिती घेऊन त्यांना नवीन व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शिबिरांमध्ये उपलब्ध सेवा
या महसूल समाधान शिबिरांमध्ये नागरिकांना पुढील सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत :
ई-मोजणी सेवा
ॲग्री-स्टॅग (Agri-Stack) नोंदणी
पीएम किसान योजनेबाबत मार्गदर्शन
तक्रार निवारण सेवा
या अभियानामुळे महसूल विषयक अनेक प्रलंबित प्रश्न शिबिरस्थळीच निकाली निघणार असून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ सुलभ पद्धतीने मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Comments
Post a Comment