कराड–उंब्रज वाहतुकीला मोठा दिलासा; पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून सिंगल पिलर उड्डाणपुलांना मंजुरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सकारात्मक निर्णय; कराड तालुक्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

कराड : विद्या मोरे

कराड शहर व कराड तालुक्यातील उंब्रज ही दोन्ही ठिकाणे व्यापारी आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची केंद्रे मानली जातात. पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (NH-48) या दोन्ही ठिकाणांमधून जात असल्यामुळे येथे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. वाढत्या वाहतुकीमुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होणे, तसेच अपघातांची शक्यता वाढणे ही समस्या गेल्या काही वर्षांपासून गंभीर बनली होती. या पार्श्वभूमीवर कराड शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार कराड शहरातील विद्यमान भरीव उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी आधुनिक पद्धतीचा सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्याचे काम सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

याच धर्तीवर उंब्रज येथेही सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि वाहनचालकांकडून सातत्याने होत होती. ही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी उंब्रज येथे प्रत्यक्ष भेट देऊन पुलाच्या संभाव्य जागेची पाहणी केली तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

नागरिकांची ही मागणी रास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी २४ ऑगस्ट २०२३ पासून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे तसेच दूरध्वनीवरून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. या पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उंब्रज येथील उड्डाणपुलाच्या प्रस्तावाची व्यावहारिकता तपासण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना दिले.

यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उंब्रज येथे येऊन पुलाच्या जागेची पाहणी केली. या पाहणीनंतर वाहतुकीची परिस्थिती, उपलब्ध जागा आणि प्रकल्पाची व्यवहार्यता याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यानंतर NHAI च्या अधिकाऱ्यांसोबत पृथ्वीराज चव्हाण यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उड्डाणपुलाच्या आराखड्याबाबत तसेच भविष्यातील वाहतुकीचा विचार करून सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सर्व प्रक्रियेनंतर विकासकामांना प्राधान्य देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कराड व उंब्रज येथे सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्यासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून संभाव्य अपघातांचे प्रमाणही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबतचा निधी मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे पृथ्वीराज चव्हाण यांना दिली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “कराड व उंब्रज या दोन्ही ठिकाणी वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या दोन्ही ठिकाणी सिंगल पिलर उड्डाणपूल होणे अत्यंत आवश्यक होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक निर्णय घेत निधी मंजूर केल्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल. कराड तालुक्याच्या विकासासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.”

कराड व उंब्रज येथील सिंगल पिलर उड्डाणपुलासाठी निधी मंजूर केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कराड तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत. या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून भविष्यात या उड्डाणपुलांमुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होऊन कराड तालुक्याच्या विकासाला नवी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार