मातंग आक्रोश महामोर्चा यशस्वी; केंद्र सरकारकडे मागण्या सादर
कराड : विद्या मोरे
जंतर मंतर, नवी दिल्ली येथे आयोजित “मातंग आक्रोश महामोर्चा” मोठ्या संख्येने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. महाराष्ट्रासह देशभरातून मातंग समाज आणि इतर वंचित अनुसूचित जाती-जमातींचे हजारो प्रतिनिधी सहभागी झाले.
महामोर्चा अनुसूचित जातींना न्याय मिळवून देणे आणि सामाजिक न्यायाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधणे हाच मुख्य उद्देश होता.
दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाला घटनात्मक मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या न्यायमुर्ती अनंत बदर समितीने अहवाल सादर केला असून, त्या अहवालावर तातडीने निर्णय घेऊन देशभर उपवर्गीकरण लागू करणे अत्यावश्यक आहे.
महामोर्चामध्ये मुख्य मागण्या:
* अनुसूचित जातींमध्ये आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे.
* दि. १ ऑगस्ट २०२४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची देशभर प्रभावी अंमलबजावणी करावी.
* न्यायमुर्ती अनंत बदर समितीच्या अहवालावर त्वरित निर्णय घ्यावा.
* लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” पुरस्कार द्यावा.
* लहुजी वस्ताद साळवे, अण्णा भाऊ साठे आणि मुक्ता साळवे यांना राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे.
* दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करावा.
* बनावट जात प्रमाणपत्रांवर कठोर कारवाई करावी.
* अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाची पुनर्रचना करून वंचित घटकांना न्याय मिळवावा.
* वंचित समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विशेष योजना राबवाव्यात.
या मागण्यांचे निवेदन केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री, भारत सरकार) यांना सादर करण्यात आले.
महामोर्च्याचे शिष्ठमंडळात दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, महिला आघाडीच्या नेत्या प्रा. पुष्पलता सकटे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. काशिनाथ सुलाखे-पाटील, दिल्ली प्रांताध्यक्ष विक्रम सोळसे, मुंबई शहर अध्यक्ष हेमंत दळवी, संजय चांदणे, चंद्रकांत सकट, कडूभाऊ लोंढे यांचा समावेश होता.
दलित महासंघ व बहुजन समता पार्टी यांनी चेतावणी दिली आहे की, शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल.
महामोर्चाला आदि. वाल्मिक समाज संघटना (हरियाना), सत्यार्थ पुरुषार्थी, कैलाश पुरुषार्थी-वाल्मिकी समाज संघटना (पंजाब), मांग गारूडी उत्कर्ष समाज संघटना, मातंग एकता आंदोलनाचे अविनाश बागवे, भारतीय लहुजी सेना नागराज कावडे, पारधी मुक्ती आंदोलनाचे सनातन भोसले, कैलास पवार यांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला.
Comments
Post a Comment