शेतकरी आत्महत्या स्मृती दिन : कराडमध्ये शेतकऱ्यांचा आत्मक्लेश आंदोलन, आत्महत्यांना आळा घालण्याची हाक
कराड, दि. १९ मार्च : विद्या मोरे
राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या मानल्या जाणाऱ्या घटनेच्या स्मरणार्थ १९ मार्च हा दिवस शेतकरी आत्महत्या स्मृती दिन म्हणून पाळला जातो. १९ मार्च १९८६ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे यांनी पत्नी व चार मुलांसह आत्महत्या केली होती. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. तेव्हापासून हा दिवस राज्यभरातील शेतकऱ्यांकडून काळा दिवस म्हणून पाळला जात असून अनेक ठिकाणी अन्नत्याग, उपोषण व आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जाते.
कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनीही या स्मृती दिनानिमित्त आत्मक्लेश आंदोलन करत शेतकरी आत्महत्यांविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. २०२४ पासून कराडमधील शेतकरी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधीस्थळी एकत्र येऊन अभिवादन करून आंदोलन करीत आहेत. यावर्षीही गुरुवारी (दि. १९) शेतकऱ्यांनी समाधीस्थळी उपस्थित राहून पुष्पांजली अर्पण केली आणि शेतकरी बांधवांच्या वेदना व्यक्त करत आत्मक्लेश केला.
शेतकऱ्यांनी यावेळी राज्यातील वाढत्या आत्महत्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्चात वाढ, हमीभावाचा अभाव, नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान आणि बाजारातील अनिश्चितता या कारणांमुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या कोलमडत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी सरकारने तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
तसेच शेतकरी आत्महत्या पूर्णपणे थांबाव्यात, शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे आणि त्यांच्या प्रश्नांकडे राज्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी दिवंगत चव्हाण साहेबांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. “शेतकरी वाचला तर देश वाचेल” असा संदेश देत शेतकऱ्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या.
या वेळी शिवाजी पाटील, कृष्णकांत शिंदे, संदेश पाटील, आनंदराव थोरात, दिगंबर माने, संपतराव खबाले, संतोष पाटील, अमित पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. आंदोलन शांततेत व संयमाने पार पडले.
Comments
Post a Comment